मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 07:38 AM2024-03-22T07:38:06+5:302024-03-22T07:39:08+5:30

वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसेला महायुतीत नेमक्या किती जागा मिळणार, यावर खलबते झाली.

Three, two or one seat for MNS? An hour and a half conversation between Shinde-Fadnavis-Raj | मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू

मनसेच्या वाट्याला तीन, दोन की एक जागा? शिंदे-फडणवीस-राज यांच्यात दीड तास गुफ्तगू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महायुतीतील सहभागाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

वांद्रे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये या तीन नेत्यांची दीड तास चर्चा  झाली. यात मनसेला महायुतीत नेमक्या किती जागा मिळणार, यावर खलबते झाली.

योग्य वेळी योग्य निर्णय : मुख्यमंत्री शिंदे यांनी राज यांच्याशी चर्चा सुरू असून, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा भेटी होतच असतात, असे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले. आम्ही एकाच बैठकीत ८० टक्के जागांबाबत निर्णय केला आहे. दुसऱ्या बैठकीत २० टक्के जागांबाबत निर्णय करू, असेही फडणवीस म्हणाले.  

बुधवारी मध्यरात्रीही भेट : राज आणि फडणवीस यांची बुधवारी मध्यरात्रीही एका अज्ञातस्थळी भेट झाल्याची चर्चा आहे. दादर येथे या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत मनसेला किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाल्याचे कळते.

तीन जागांची चर्चा

  1. मनसेकडून महायुतीकडे तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आला.  यामध्ये दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश असल्याचे कळते. 
  2. दक्षिण मुंबईतील जागा आणि एक राज्यसभा या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. या जागांसाठी महायुतीतील कोणत्या पक्षाने त्याग करायचा, यावर तिघांमध्ये चर्चा झाली. 
  3. राज ठाकरे यांना शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कोट्यातील जागा दिली जाऊ शकते. भाजपकडे दक्षिण मुंबई, तर शिंदे गटाकडे  शिर्डी किंवा नाशिकचा पर्याय आहे. या जागांबाबत राज यांची भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतली.  

Web Title: Three, two or one seat for MNS? An hour and a half conversation between Shinde-Fadnavis-Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.