सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:57 PM2024-04-02T19:57:13+5:302024-04-02T19:58:30+5:30

Sangli Loksabha Constituency: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्यापही तिढा सुटला नाही. या जागेवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. 

Sangli Loksabha Seat Controversy in Mahavikas Aghadi, MLA Vishwajit Kadam will be absent from the Congress meeting | सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर

मुंबई - Vishwajeet kadam on Sangali LS Seat ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतसांगलीच्या जागेवरून तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार प्रचंड नाराज झाले आहेत. त्याबाबत नुकतेच आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी दिल्लीत धाव घेतली होती. मात्र सांगलीबाबत अद्यापही ठोस निर्णय होत नसल्याने आता काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा पवित्रा नेत्यांनी घेतला आहे.

याबाबत आमदार विश्वजित कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे, त्यात म्हटलंय की, नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचं दिनांक ३० मार्च रोजीचं काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी व आपला मनापासून आभारी आहे असं त्यांनी म्हटलं. 

परंतु राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात. गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आजही ठाम आहे. तसेच अद्याप ही सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे असं आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार वाद आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा हवी यासाठी ठाकरे गटाने सांगलीवर दावा केला. कोल्हापूरची विद्यमान जागा शिवसेनेकडे होती. मात्र त्या जागेवर शाहू महाराजांनी हाताचा पंजा चिन्हावर लढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कोल्हापूरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. आता कोल्हापूरची जागा न मिळाल्याने सांगलीची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी त्या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. त्यावरून सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यात आता काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे सांगलीचा तिढा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Sangli Loksabha Seat Controversy in Mahavikas Aghadi, MLA Vishwajit Kadam will be absent from the Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.