"महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले"; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:29 PM2024-04-09T16:29:36+5:302024-04-09T16:30:14+5:30

मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर 

"Mahabhrashtachari Aghadi looted the state for two and a half years under the leadership of Uddhav Thackeray"; BJP's attack | "महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले"; भाजपाचा घणाघात

"महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले"; भाजपाचा घणाघात

PM Modi BJP vs Uddhav Thackeray: गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर आज सुटला. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील महत्त्वाच्या नेतेमंडळींनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि राज्यात २१-१०-१७ (शिवसेना उद्धव ठाकरे गट-२१ जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट-१० आणि काँग्रेस-१७) असा फॉर्म्युला ठरवला. या पत्रकार परिषदेच्या वेळी अनेक नेतेमंडळींनी सरकारवर तोफ डागली. भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे भाकड पक्षाचे नेते, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. त्यावर, महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटल्याचा पलटवार भाजपाकडून करण्यात आला.

"महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उबाठा यांनी उत्तर द्यावं. खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल," असे जोरदार प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

"सूर्यग्रहण आणि अमावास्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता. जे भाषण झाले ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते. शिवसेना प्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी बोलले. निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करत असतील तो घटनेवर हात ठेवून घेतलेल्या शपथेचा भंग होतो. त्यामुळेच मला वाटते की, नरेंद्र मोदींचे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचे होते. कारण ते अध्यक्षही नाहीत", या शब्दांत उद्धव ठाकरेंनी PM मोदींवर टीका केली होती.

Web Title: "Mahabhrashtachari Aghadi looted the state for two and a half years under the leadership of Uddhav Thackeray"; BJP's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.