मोहिते पाटील बंधूंनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट; सव्वा तासाच्या चर्चेत काय ठरलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:03 PM2024-04-04T17:03:28+5:302024-04-04T17:06:38+5:30

Sharad Pawar : सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाच्या घरवापसीची चर्चा रंगत असून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

madha lok sabha Mohite Patil brothers met Sharad Pawar secretly What was decided in the discussion of half an hour | मोहिते पाटील बंधूंनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट; सव्वा तासाच्या चर्चेत काय ठरलं?

मोहिते पाटील बंधूंनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट; सव्वा तासाच्या चर्चेत काय ठरलं?

Madha Lok Sabha ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा झाली असून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. मात्र काही मतदारसंघात अजूनही तिढा असून राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी विचारमंथन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची माढा लोकसभेबाबत अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना आपण माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याचे जाहीर केलं होतं. मात्र जानकर यांनी यू-टर्न घेत महायुतीसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाच्या घरवापसीची चर्चा रंगत असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच बुधवारी रात्री धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू व भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

धैर्यशील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभेबाबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठी मोहिते पाटील बंधूंनी सिल्व्हर ओकवर मागच्या दाराने प्रवेश केल्याचे समजते. आम्हाला उमेदवारी मिळाल्यास माढ्याची जागा कशी जिंकता येईल, याबाबत धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी पवार यांना माहिती दिली. मात्र शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे. 

माढ्यातून लढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते उत्सुक आहेत. यामध्ये अभयसिंह जगताप आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी तर थेट पत्र लिहीत या मतदारसंघात अभयसिंह जगताप यांना उमेदवारी देण्यात याावी, अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. अशातच मोहिते पाटील बंधूंनी शरद पवारांची भेट घेत सविस्तर चर्चा केल्याने लवकरच त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होऊन मोहिते पाटील कुटुंब तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या पहिल्या यादीतच विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार नक्की कोणत्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: madha lok sabha Mohite Patil brothers met Sharad Pawar secretly What was decided in the discussion of half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.