'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:44 PM2024-04-04T18:44:33+5:302024-04-04T18:54:31+5:30

Hingoli Loksabha Seat: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला.

Hingoli Lok Sabha Election 2024 - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | 'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

हिंगोली - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) महायुतीमुळे मविआ नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. घरात बसून, उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. फेसबुक लाइव्ह करून राज्य चालत नाही. ज्यांचे आयुष्य कट, करप्शन आणि कमिशनमध्ये गेले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उबाठा बसले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल करत 'उबाठा'कडे अजेंडा पण नाही आणि स्वतःचा झेंडा पण नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेनंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथे आला आहे. बाळासाहेबांचा ८०% समाजकारणाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. यापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. बाळासाहेबांच्या प्रखर विचारांचे खच्चीकरण झाले. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊ लागले. मतदारांनी जो विश्वास दाखवला होता त्याला बाजूला केले. एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली होती. जनतेने तुम्हाला कौल दिला. मात्र ज्यांचे आयुष्य कट, कमिशन, करप्शनमध्ये गेले त्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून 'उबाठा' बसलेत. त्यांच्याकडे अजेंडा नाही आणि झेंडाही नाही. विरोधकांना नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या द्वेषाने पछाडलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जितका तिरस्कार कराल, तितकी त्यांची मते वाढतील. २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मतदारांनी विरोधकांना निवडणुकीत जागा दाखवून दिली असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबुराव कदम यांच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. मागच्या सरकारचे मुख्यमंत्री असते तर निवडणुकीत किती खर्च करणार? आम्हाला किती देणार? असा प्रश्न बाबुराव कदमांना विचारला असता मात्र आमच्याकडे हे चालत नाही. आता बाबुरावांना तिकिट मागण्यासाठी मुंबईला येण्याची गरज नाही. हिंगोली, यवतमाळ मोठ्या मताधिक्याने जिंकायचे आहे आणि बाबुराव कदम यांना थेट दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे, चांगल्या लोकांना पुढे आणण्याचे काम आम्ही शिवसेनेत करतोय असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराने राज्याचा सर्वांगीण विकास करत आहोत. शिवसेनेत आता ‘’राजा का बेटा राजा नहीं बनेगा, काम करनेवाला राजा बनेगा!’’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री झाल्याचे अजूनही अनेकांना सहन होत नाही. ज्याप्रमाणे मुघलांना पाण्यात संताजी धनाजींचे घोडे दिसायचे तसेच इथं काहींना एकनाथ शिंदे दिसत आहेत. त्यांच्या विरोधामुळे आपण अधिक जोमाने काम करु लागलो. सामान्य कार्यकर्त्याला आमदार, मुख्यमंत्री बनविण्याची ताकद हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. याच विचारांचा वारसा शिवसेनापुढे चालवत आहे, म्हणूनच हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. भविष्यात एखादा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर सगळ्यात जास्त आनंद आपल्याला होईल अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: Hingoli Lok Sabha Election 2024 - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.