एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार: अमित शाह यांच्यासोबत हाय व्होल्टेज बैठक, तोडगा निघणार?

By समीर देशपांडे | Published: March 8, 2024 03:04 PM2024-03-08T15:04:55+5:302024-03-08T15:08:04+5:30

राजधानी नवी दिल्लीत जागावाटपाबाबत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

cm Eknath Shinde to go to Delhi immediately High voltage meeting with Amit Shah about lok sabha seat sharing | एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार: अमित शाह यांच्यासोबत हाय व्होल्टेज बैठक, तोडगा निघणार?

एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार: अमित शाह यांच्यासोबत हाय व्होल्टेज बैठक, तोडगा निघणार?

CM Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. व्यवहार्य जागांची मागणी करा, असं भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगण्यात आलं आहे. तसंच महायुतीच्या काही विद्यमान खासदारांची तिकिटेही कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर विमानतळावरूनच थेट दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यक्रम आटोपते घेत वेळ साधण्याची कसरत संयोजकांना करावी लागत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कोरोची येथील भाषणात मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

एकनाथ शिंदे हे सकाळी वेळेत कोरोची येथील महिला मेळाव्याला उपस्थित राहिले. नियोजित कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कार्यक्रम आवरून ते पुन्हा कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. तेथूनच ते थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून त्यावर शिक्कामोर्तब करण्याची महायुतीमध्ये गडबड असून याचाच एक भाग म्हणून शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत.

दरम्यान, दिल्लीतील बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीला एक आकडी जागा?

महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक आमदार असतानाही भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं. तसंच राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही मंत्रिमंडळात चांगली खाती दिली आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर वाढवल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप ३२ ते ३७ जागा लढणार असून ११ ते १६ जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सोडणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. प्रदेश व केंद्रीय भाजपने विविध कंपन्यांकडून सहा महिन्यांत सूक्ष्म सर्वेक्षणे केली. त्यासह भाजप व रा. स्व. संघाच्या यंत्रणेच्या फिडबॅकद्वारे ३५ जागा लढवाव्यात, अशी मागणी  नेत्यांनी श्रेष्ठींकडे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे,  सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यावेळी, या नेत्यांनी ‘आमची मागणी ३५ चीच आहे, आणखी एक जागा मित्रपक्षांना सोडा, पण ३४ जागा लढवायलाच हव्यात’ असा आग्रह धरल्याची माहिती आहे.
 

Web Title: cm Eknath Shinde to go to Delhi immediately High voltage meeting with Amit Shah about lok sabha seat sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.