पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:28 PM2024-04-26T14:28:09+5:302024-04-26T14:29:37+5:30

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून आढावा

Ban on drone cameras during PM Narendra Modi meeting, 1500 police forces along with security forces deployed in Kolhapur | पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

संग्रहित छाया

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा शनिवारी (दि. २७) तपोवन मैदानावर होणार असून, त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सभेच्या ठिकाणी खासगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विविध सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शनिवारी सायंकाळी तपोवन मैदानावर होणार आहे. मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. 

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी अलंकार हॉलमध्ये बंदोबस्ताचा आढावा घेऊन पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली. गुरुवारी रात्रीच बंदोबस्ताचे वाटप केले असून, महत्त्वाच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त तैनात होणार आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतरच नेते, कार्यकर्ते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि सभेच्या येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हॉटेल, लॉजेसची तपासणी

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील हॉटेल, लॉजेस यांची तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांवर कारवाया केल्या जात आहेत.

Web Title: Ban on drone cameras during PM Narendra Modi meeting, 1500 police forces along with security forces deployed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.