'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने कलाकारांनी एचआयव्हीग्रस्त मुलांसह साजरी केली अनोखी 'पार्टी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:05 PM2018-08-03T17:05:26+5:302018-08-05T07:15:00+5:30

रात्रभर काम करूनदेखील 'पार्टी' च्या सर्व टीमने हे गाणे सेटवर मोठ्या आवाजात लावत, संपूर्ण क्र्यू मेंबरसोबत ताल धरला होता.

Party Marathi Movie Starcast Friendship Day Celebration with HIV affected children | 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने कलाकारांनी एचआयव्हीग्रस्त मुलांसह साजरी केली अनोखी 'पार्टी'

'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने कलाकारांनी एचआयव्हीग्रस्त मुलांसह साजरी केली अनोखी 'पार्टी'

googlenewsNext

नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि  सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्स प्रस्तुत 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाने नुकताच गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या डीझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये, सर्व कलाकारांच्या उपस्थितीत 'फ्रेंडशिप डे साजरा केला. कलाकारांनी सर्व मुलांशी संवाद साधत, त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या. संस्थेच्या मुलांनीही 'पार्टी; सिनेमातील 'भावड्या' या गाण्यावर ठेका धरत, फ्रेंडशिप डे च्या या धम्माल 'पार्टी'चा मनमुराद आनंद लुटला.

सिनेमातील 'भावड्या' या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, संगीतसृष्टीतील दोन मित्रांनी, मैत्रीवर आधारित असलेले हे गाणे, खास मित्रांसाठी सादर केले आहे. अवधूत गुप्ते आणि अमितराज या जुन्या मित्रांचे हे गाणे 'फ्रेंडशिप डे'च्या मुहूर्तावर लाँँच करण्यात आले असल्यामुळे, या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळेल, अशी आशा आहे. अमितराजच्या चालीवर अवधूतने गायलेल्या या गाण्याचे लिखाण सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केले आहे. मित्राच्या हळदीचे हे भन्नाट गाणे, प्रेक्षकांना नादखुळा करून सोडणारे आहे. हे गाणे रात्रीचे असल्याकारणामुळे, त्याच्या चित्रीकरणासाठी सर्व कलाकारांना सलग दोन रात्र काम करावे लागले होते. शिवाय, गाण्यात हळदीचा माहोल उभा करण्यासाठी तब्बल ५० किलो हळदीचा वापर यात करण्यात आला असल्याचे समजते. उडत्या चालीचे हे गाणे इतके जोशपूर्ण आहे कि, या गाण्याची झिंग चित्रीकरण संपल्यानंतरही उतरली नव्हती. कारण, रात्रभर काम करूनदेखील 'पार्टी' च्या सर्व टीमने हे गाणे सेटवर मोठ्या आवाजात लावत, संपूर्ण क्र्यू मेंबरसोबत ताल धरला होता. शिवाय, उरलेली हळद उधळवत या गाण्याची मज्जादेखील लुटली.

अशा या धम्माल 'पार्टी'चा रंग चढवणाऱ्या सिनेमात, सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर ,प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत असून, या सहाजणांची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा,रसिकांना 'फ्रेंडशिप डे' चे अनोखे सरप्राईज घेऊन येत आहे.
 

Web Title: Party Marathi Movie Starcast Friendship Day Celebration with HIV affected children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.