फोंडाघाटात वाघाच्या संपूर्ण परिवाराने पुन्हा दिले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 02:45 PM2021-05-22T14:45:22+5:302021-05-22T14:47:42+5:30
Tiger kolhapur : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. आता तर संपूर्ण परिवाराचे दर्शन झाले आहे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आहे. आता तर संपूर्ण परिवाराचे दर्शन झाले आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट येथे या व्याघ्र परिवाराचे दर्शन झाल्याची माहिती राधानगरी वन्यजीव विभागाचे वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
आंबोली, दोडामार्ग, तिलारी या जंगलक्षेत्राला गोव्यातील म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्रही जोडलेले असल्यामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता विशेषत: वाघांच्या प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.
राखीव संवर्धन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे वाघांचा हा भ्रमणमार्ग संरक्षित झाला आहे. हा मार्ग सलग जोडला गेल्यामुळेच आंंबोली, चंदगड, आजरा, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यापर्यंत वाघांच्या हालचाली वाढताना दिसत आहेत. कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी तसेच तिलारी वन्यजीव अभयारण्याचा परिसर हा टायगर कॅरिडॉर म्हणून ओळखला जातो. २०१४ मध्ये झालेल्या जनगणनेत तीन वाघ असल्याची नोंद आहे.
कोकणात चिरा आणण्यासाठी गेलेल्या मडिलगे येथील एका ट्रकचालकाला बुधवारी (दि. १९) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोंडा घाटात पूनम हॉटेलच्या वरच्या बाजूस एक वाघीण आणि दोन बछडे दिसले. या चालकाने वाघिणीच्या बछड्याने झाडावर उडी मारतानाचा व्हिडिओ वन विभागाकडे सुपुर्द केला आहे.
आतापर्यंत तीन वेळा दर्शन
यापूर्वीही मार्च आणि एप्रिल महिन्यांत वनविभागाला वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे आढळले होते. आंबोलीत यापूर्वीही वाघांच्या पावलांचे ठसे आणि वाघांनी केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले होते. लॉकडाऊनमध्येही आंबोली परिसरात वाघाने म्हशीची शिकार केली होती. मार्च महिन्यात आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाने केलेली गव्याची शिकार आणि वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसे सापडले होते. एप्रिल महिन्यात आंबोलीतील हिरण्यकेशी परिसरात वाघाचे दर्शन झाले होते. येथील जंगल परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ दिसला होता. परिसरातील ग्रामस्थांनाही या वाघाचे दर्शन होत होते. त्या संदर्भात त्यांनी वन विभागाला वर्दी दिली होती.
राखीव संवर्धन क्षेत्र वाघांसाठी फायद्याचे
वन्यजीव मंडळाच्या शिफारशीवरून डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकारने पाच हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या आंबोली-दोडामार्ग आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील चंदगड तालुक्यातील जंगलक्षेत्र संरक्षित करून त्याला कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून राखीव केले होते. तसेच याला जोडून असलेल्या २९.५३ चौरस किलोमीटरचे तिलारी जंगलक्षेत्रही राखीव संवर्धन म्हणून संरक्षित केले होते. तीन राज्यांच्या सीमांवरील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.