आता झुंज अव्वल क्रमांकासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:31 AM2017-09-15T01:31:21+5:302017-09-15T01:31:51+5:30

whatsapp join usJoin us
Now for the top bilateral number | आता झुंज अव्वल क्रमांकासाठी

आता झुंज अव्वल क्रमांकासाठी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन 
रविवारपासून भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. या मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांत मोठी स्पर्धा होईल. कारण, जो संघ ४-१ किंवा ५-० अशा मोठ्या फरकाने बाजी मारेल, तो अव्वल स्थान पटकावेल. त्यामुळे दोन्ही संघांकडे खूप संधी आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारताकडे अधिक संधी असल्याचे म्हटले जाते. काही प्रमाणात ते
खरेही आहे; पण आॅस्ट्रेलिया विश्वविजेता असल्याचे विसरता कामा नये. २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळविले आणि तेव्हापासून हा संघ मजबूत आहे. त्यामुळे विराट सेनेला मोठ्या फरकाने विजय मिळविणे सोपे जाणार नाही. श्रीलंकेला पाचही सामन्यांत टीम इंडियाने लोळवले खरे; पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध कडवी लढत होईल. कारण, आॅसी संघाची ताकद खूप आहे. त्यांना मिशेल स्टार्कसारख्या काही स्टार खेळाडूंची उणीव नक्कीच भासेल; परंतु तरीही त्यांचा संघ मजबूत आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेझलवूड यांच्यामुळे आॅसी संघाला बळकटी आली आहे. त्यामुळे टीम इंडियापुढील आव्हान सोपे नसेल. म्हणून मला वाटते, की ही मालिका खूप रोमांचक होईल.
या मालिकेत सर्वांत जास्त लक्ष विराट कोहलीकडे असेल. केवळ कर्णधार म्हणून नाही, तर त्याने यशस्वी कर्णधार म्हणून ओळख निर्माण केली आहे. आपले सातत्य कायम राखण्यात कोहली यशस्वी ठरतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच, त्याने ३० एकदिवसीय शतके झळकावली आहेत; त्यामुळे सध्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम फलंदाज असल्याचे अनेकांचे मत आहे. पण, कोहलीपुढे स्टीव्ह स्मिथच्या रूपाने एक आव्हानही आहे. या दोघांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण, अशी चर्चा सतत रंगते. माझ्या मते, मर्यादित षटकांचा विचार करता कोहली सर्वोत्तम आहे.
पण तरी, भारताच्या यशातील महत्त्वाचा भाग कोहली नसेल, तर त्याच्याही व्यतिरिक्त इतर खेळाडू असे आहेत, जे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता राखून आहेत. भारतीय फिरकीपटूंपुढे सर्वांत जास्त आव्हाने असतील. कारण, रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा ही हुकमी जोडी या मालिकेत खेळणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत चहल, कुलदीप यादव यांच्यासारख्या गोलंदाजांची मोठी परीक्षा होईल. कारण, आॅस्ट्रेलियन फलंदाजांचे फुटवर्क चांगले असते. जर, हे फिरकीपटू अपयशी ठरले, तर भारताची काय रणनीती असेल, हे पाहावे लागेल. पण, सध्या तरी मला हा सामना आॅस्ट्रेलियाचे फलंदाज विरुद्ध भारताचे फिरकी गोलंदाज, असा दिसतो.

Web Title: Now for the top bilateral number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.