भारतीय संघासाठी मधली फळी हेच मुख्य दुखणे!

तुमची तयारी अजून अपूर्ण आहे! तुम्ही असाल विश्वचषक स्पर्धेमधील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार, पण आम्हीही त्या शर्यतीत आहोत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:35 AM2019-03-18T06:35:42+5:302019-03-18T06:36:16+5:30

whatsapp join usJoin us
 The middle order for the Indian team is the main pain! | भारतीय संघासाठी मधली फळी हेच मुख्य दुखणे!

भारतीय संघासाठी मधली फळी हेच मुख्य दुखणे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रणजीत दळवी (ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)

तुमची तयारी अजून अपूर्ण आहे! तुम्ही असाल विश्वचषक स्पर्धेमधील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार, पण आम्हीही त्या शर्यतीत आहोत! असे जणू विधानच आॅस्टेÑलियाने एकदिवसीय मालिकेअंती करताना भारतीय संघासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेले सात-आठ महिने दोन डझन कसोटी सामने, प्रत्येकी डझनभर एकदिवसीय आणि टी-२० लढती अशा भरगच्च आणि दमछाक करणाऱ्या कार्यक्रमाअंती ज्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागले त्याचे निराकरण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्पर्धा सुरू होईल तेव्हा झालेले असेल? ही चर्चा काही दिवस होईल, पण थोड्याच अवधीत आयपीएल सुरू होताच आलेल्या अपयशांचा विसर पडेल आणि जसजशी आयपीएल रंगत जाईल व त्यात जे कोणी छाप पाडतील, प्रभावी ठरतील, त्यांच्या नावाचा डंका चाहते पिटू लागतील. आपल्यासारख्या क्रिकेटवेड्या देशात हे स्वाभाविक असले, तरी प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेसाठी जेव्हा संघ निवडला जाईल, तेव्हा एखाद दुसरा अपवाद वगळता अपेक्षेनुसार निवड होईल.
स्पर्धेसाठी जो १५ जणांचा संघ निवडला जाईल त्यात फलंदाजीच्या क्रमानुसार पहिले तीन कोण हे सर्वांनाच ठाऊक आहे. शिखर, रोहित व विराट! हे तिघे फॉर्ममध्ये असतील, तर कोणत्याही गोलंदाजाची खैर नाही. तेव्हा या तिघांच्या कामगिरीवरच आपण विजेते ठरू की कसे हे निश्चित होईल. पण खरी डोकेदुखी यानंतरच सुरू होत आहे. क्रमांक चार ही भारतीय संघाची मोठी समस्या आहे. कोण ती सोडवू शकतो? अंबाती रायुडू, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव की आणखीन कोण? खरे तर ही समस्या उद्भवली नसती. पण लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांना एका टीव्ही शोमध्ये फुशारक्या मारण्यापासून स्वत:ला रोखता आले नाही. त्यामुळे भारताला मोहिमेची तयारी करण्यासाठी जी एक निर्णायक गती व दिशा लाभली होती, त्यावर परिणाम झाला आणि त्याचाच प्रत्यय मालिकेदरम्यान आला. अधिकाधिक खेळाडूंना संधी देऊन संघनिवड करावी व त्याचबरोबर ‘रोटेशन पॉलिसी’ राबवून खेळाडूंना आवश्यक ती विश्रांती देण्याचे जे धोरण राबविले गेले तेही यासाठी निश्चित कारणीभूत ठरले आहे. एवढे करूनही आयपीएल खेळताना या खेळाडूंना कितपत विश्रांती मिळेल व ते दुखापतमुक्त राहतील याची खात्री देता येणार नाही. हल्लीच्या हल्ली हार्दिक, केदार जाधव व अधूनमधून एखाद-दुसरा वेगवान गोलंदाज, तर कधी महेंद्रसिंग धोनी यांना लहान-मोठ्या दुखापती झालेल्या आहेत. दुखापती पूर्वसूचना देऊन घडत नसतात. याचा विचार करता क्रिकेट बोर्ड आणि निवड समिती हे येत्या दोन-अडीच महिन्यांमध्ये कसे ‘मॅनेज’ करतील हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
या मालिकेमध्ये जो पराभव झाला त्याचा परिणाम खेळाडूंच्या मनौधैर्यावर निश्चितच झालेला असणार. आॅस्टेÑलिया हा इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकाप्रमाणे आपल्यासमोर आव्हान देण्यास उभा ठाकणार हे आता पक्के झाले आहे. हा विचार सर्वच संभाव्य खेळाडूंच्या मनात घोळत राहील. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या ‘मॅच कंडिशन्स’मध्ये सराव अवश्य होईल, पण तो सांघिक सराव नसेल. तेव्हा खेळाच्या भाषेत सांगायचे झाल्यास भारतीय संघाला ‘रिग्रूप’ करण्याची संधी निश्चित नाही आणि हे चित्र थोडेसे चिंता वाढविणारे आहे. ही मालिका जिंकून खेळाडू आयपीएलमध्ये गेले असते, तर त्यांचा आत्मविश्वास वाढला असता. तेव्हा विश्वचषकातील आपल्या भविष्याविषयी बोलायचे झाल्यास, आपले गोलंदाजीचे जे ‘युनिट’ आहे, त्याला आपली कामगिरी उंचवावी लागेल. तेव्हा सुरुवातीला किंवा प्राथमिक फेरीत त्यांना कसा सूर गवसतो हे महत्त्वाचे आहे. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच भारताचा वेगवान मारा विश्वदर्जाचा दिसतो आहे. भारताच्या यशाची चावी जशी वरच्या तीन फलंदाजांच्या हाती आहे, तशीच तीन-चार वेगवान गोलंदाजांच्या हातीही आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा उमेश यादव की आणखीन कोणी, यांना मोठी भूमिका पार पाडावी लागेल. शमीला फॉर्म गवसला असला, तरी त्याच्यावर कोलकाता पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्यांतर्गत, पत्नीला त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपपत्र दाखल केले आहे. ही बाब गंभीर असून त्याचा स्पर्धेतील सहभाग आता अनिश्चित समजायचा? हा त्याला व संघाला मोठा धक्का असेल. तिकडे ॠषभ पंतची कामगिरी असमाधानकारक ठरली आहे. मधली फळी स्थिरस्थावर नाही हे उघड आहे. त्याचे उत्तर शोधणाऱ्या निवड समितीला एकच विचारावेसे वाटते की, अजिंक्य रहाणेचा आता तरी विचार करणार का?

Web Title:  The middle order for the Indian team is the main pain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.