ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळेल, याची सर्वांना खात्री होती. पण, नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला.
![]()
भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सावध खेळावर भर दिला. भारतीय गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियाच्या धावांना लगाम लावला होता. दहाव्या षटकात या दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पण, 14व्या षटकात समन्वयाच्या अभावापायी ही जोडी तुटली. वॉर्नरनं दुसऱ्या धावेची हाक दिली आणि संभ्रमात असलेला फिंच जरा उशीरा धावला. त्यामुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. त्यानंतर वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ या अनुभवी जोडीनं 72 धावांची भागीदारी केली. दरम्यान वॉर्नरने वन डे क्रिकेटमधील त्याचे सर्वात संथ अर्धशतक पूर्ण केले. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात वॉर्नर झेलबाद झाला. स्मिथनं एका बाजूंन खिंड लढवताना उस्मान ख्वाजासह अर्धशतकी भागीदारी केली.
![]()
ही डोईजड होऊ पाहणारी जोडी तोडण्यासाठी कोहलीनं पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहला पाचारण केले. बुमराहने ख्वाजाचा त्रिफळा उडवून त्याचा निर्णय योग्य ठरवला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात स्मिथ व मार्कस स्टॉइनिसला ( 0) बाद करून ऑस्ट्रेलियाला आणखी बॅकफुटवर टाकले. स्मिथने 70 चेंडूंत 69 धावा केल्या. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलचा अडथळा चहलने दूर केल्याने भारताचा विजय पक्काच झाला. अॅलेक्स कॅरीनं 25 चेंडूंत अर्धशतक झळकावून संघर्ष केला, परंतु त्याला उशीर झाला होता. बुमराहने 49व्या षटकात केवळ एक धाव देत ऑस्ट्रेलियाच्या आशा संपुष्टात आणल्या.