ICC U-19 World Cup 2018: Shubhaman Gill is the first Indian batsman to score a century against Pakistan | ICC U-19 World Cup 2018: शुभमन गिल ठरला पाकिस्तानविरोधात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज
ICC U-19 World Cup 2018: शुभमन गिल ठरला पाकिस्तानविरोधात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज

ख्राईस्टचर्च - अंडर-19 वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यात भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा तब्बल 203 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. फायलनमध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. शनिवारी अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्तानविरोधात मिळालेल्या विजयाचा खरा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल अंडर-19 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर शुभमन गिल पहिला भारतीय फलंदाज आहे ज्याने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं आहे. शुभमनने नाबाद 102 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने साच चौकार ठोकले. 

शुभमनने याआधी तीन अर्धशतकं केली आहेत, मात्र तो शतक करु शकला नव्हता. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर शुभमन स्ट्राइकवर होता. त्यावेळी तो 99 धावांवर खेळत होता. मोहम्मद मूसाच्या गोलंदाजीवर शुभमनने लाँग ऑफला हवेत फटका मारला. चेंडू हवेत असल्याने पाकिस्तानी खेळाडूने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण झेल सुटला आणि अम्पायरनेही नो बॉल दिला. त्यावेळी शुभमनने धावून दोन धावा पुर्ण केल्या आणि आपलं पहिलं शतक साजरं केलं. 

या शतकासोबत शुभमनने पाकिस्तानच्या सलमान बटचा रेकॉर्ड तोडला आहे. याआधी 2002 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्‍ड कपमध्ये सलमान बटने 85 धावांची नाबाद खेळी केली होती. विराट कोहलीने 2008 मध्ये वेस्टइंडिजविरोधात 73 चेंडूत शतक ठोकलं होतं आणि 2016 मध्ये नामिबियाविरोधात ऋषभ पंतने 82 चेंडूत शतक केलं होतं. आणि आता शुभमन गिलने पाकिस्ताविरोधात 93 चेंडूत शतक ठोकलं आहे. 

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा; वर्ल्ड कप एका पावलावर
अंडर 19 वर्ल्डकपमधील आपली विजयी घोडदौड भारतीय संघाने कायम ठेवली असून क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने पाकिस्ताननचा तब्बल 203 धावांनी पराभव करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहता वर्ल्ड कप जिंकण्याची पुरेपूर संधी संघाकडे आहे. शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान संघ मात्र फक्त 69 धावांतच गारद झाला. 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने निर्धारीत 50 षटकांत  9 बाद 272 धावा फटकावल्या.  शुभमन गिल याने फटकावलेले नाबाद आणि कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांच्यातील दणदणीत सलामी भागीदारी हे भारतीय संघाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पृथ्वी शॉ आणि कालरा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या शुभमनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. डावातील शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण करणाऱ्या गिलने 94 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा फटकावल्या. 

273 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाचा एकही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. परिणामी एकामागोमाग एक फलंदाज तंबूत परतत होते. 50 धावा पुर्ण करण्याआधीच पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. 20 ओव्हर्सनंतर पाकिस्तानची परिस्थिती 45 धावांवर सहा विकेट अशी झाली होती. अखेर 69 धावांत संपुर्ण संघ गारद झाला आणि भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताकडून ईशान पोरेलने चार तर शिवा सिंग आणि आर परागला प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 
 


Web Title: ICC U-19 World Cup 2018: Shubhaman Gill is the first Indian batsman to score a century against Pakistan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.