फ्लॅश बॅक : देशभरात पडझड होत असताना औरंगाबादकर काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:38 PM2019-04-06T16:38:07+5:302019-04-06T16:39:27+5:30

लोकसभेची चौथी निवडणूक : इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बी.डी. देशमुखांना पुन्हा संधी

Flashback : Aurangabad backs Congress in fourth lok sabha election | फ्लॅश बॅक : देशभरात पडझड होत असताना औरंगाबादकर काँग्रेसच्या पाठीशी

फ्लॅश बॅक : देशभरात पडझड होत असताना औरंगाबादकर काँग्रेसच्या पाठीशी

googlenewsNext

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : नेहरू, शास्त्री युगाचा अस्त, नेतृत्वावरून माजलेल्या बेदिलीने देशातील अनेक राज्यांत काँग्रेसला १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला; परंतु औरंगाबादसह महाराष्ट्राने काँग्रेसची उभारी वाढविली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाऊराव दगडूराव देशमुख विक्रमी ८३ हजार ४६४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. करिश्माई नेहरू युगातही काँग्रेसला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. 

‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या घोषणा देशात घुमत असतानाच १९६२ मध्ये चीनने भारतावर अतिक्रमण केले व त्यात भारताला अपमानजनक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अल्पावधीतच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हाती देशाची सूत्रे आली; परंतु पुढे जेमतेम १९ महिन्यांनंतर त्यांचेही निधन झाले. त्यानंतर १९६६ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्या महिला इंदिरा गांधी आल्या. काँग्रेसने १९६७ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची चौथी निवडणूक लढली. 

औरंगाबादेतून काँग्रेसने पुन्हा एकदा भाऊराव देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी होते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीनिवास गणेश सरदेसाई (एस.जी. सरदेसाई), भारतीय जनसंघाचे बी. गंगाधर आणि अपक्ष एम.एस.पी.एफ. मोहंमद. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ८१ हजार ५०५ मतदार होते. त्यापैकी २ लाख ७० हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ हजार ४४ मते अवैध ठरली. झालेल्या एकूण मतदानाच्या ५५.८२ टक्के; अर्थात १ लाख ३५ हजार ८६५ मते मिळवीत बी.डी. देशमुख दुसऱ्यांदा औरंगाबादचे खासदार झाले. देशमुख यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सरदेसाई यांना २१.५३ टक्के म्हणजेच ५२ हजार ४०१ मते मिळाली. जनसंघाचे बी. गंगाधर यांना ३७ हजार ८८३, तर अपक्ष मोहंमद यांना १७ हजार २६६ मते मिळाली. 

मराठवाडा, महाराष्ट्राची साथ
या निवडणुकीत दिल्ली, गुजरात, मद्रास, ओरिसा, प. बंगाल, राजस्थान, केरळ या सात राज्यांतून काँग्रेसने बहुमत गमावले होते; परंतु या पडझडीच्या काळातही मराठवाडा व महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. महाराष्ट्रातील ४५ पैकी ३७ जागा काँग्रेसने जिंकल्या. मराठवाड्यातील बीडचा अपवाद वगळता सर्व सहा जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसकडे चौथ्यांदा देशाची सत्ता आली; परंतु काँग्रेसच्या मताचा टक्का ४१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. गेल्या निवडणुकीत ३६१ जागा पटकावणारी काँग्रेस या निवडणुकीत जेमतेम २८३ जागेवर विजयी झाली व इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या.

एस.जी. सरदेसाई यांचा अल्प परिचय 
१९०७ मध्ये महाराष्ट्रात जन्मलेले सरदेसाई यांचे १९९६ मध्ये देहावसान झाले. ते साम्यवादी विचारवंत, कार्यकर्ते होते. १९६५ मध्ये चिनी आक्रमनानंतर देशात भारतीय कम्युनिस्ट पक्षात चीनवादी व राष्ट्रवादी, अशी उभी फूट पडून मार्क्सवादी गटाची स्थापना झाली. त्यात सरदेसाई हे राष्ट्रवादी कम्युनिस्टांच्या बाजूने उभे राहिले. तत्पूर्वी, एकसंघ सीपीआयच्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीचे ते सदस्य होते. महाराष्ट्रातून ते राज्यसभेवरही गेले होते. त्यांचे ‘प्रोगेस अ‍ॅण्ड कन्झर्व्हेशन इन एसियंट इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

Web Title: Flashback : Aurangabad backs Congress in fourth lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.