आमची जात चंद्रपूर आमचा धर्म महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:35 AM2019-04-08T00:35:39+5:302019-04-08T00:36:24+5:30

राजकारण करताना आम्ही कधी जात, धर्म, पक्ष पाहिला नाही. सामान्य माणसांची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी प्रयत्न केला आहे. हा जिल्हा नेहमीच विकासात पुढे जावा. या जिल्ह्याची जनता आनंदी व्हावी. हा जिल्हा संपन्न व्हावा.

Our caste Chandrapur is our religion Maharashtra | आमची जात चंद्रपूर आमचा धर्म महाराष्ट्र

आमची जात चंद्रपूर आमचा धर्म महाराष्ट्र

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भाजपचा विजयी संकल्प मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजकारण करताना आम्ही कधी जात, धर्म, पक्ष पाहिला नाही. सामान्य माणसांची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी प्रयत्न केला आहे. हा जिल्हा नेहमीच विकासात पुढे जावा. या जिल्ह्याची जनता आनंदी व्हावी. हा जिल्हा संपन्न व्हावा. जाती-धर्माच्या बाहेर जावून या जिल्ह्याचा विकास व्हावा. आमची जात चंद्रपूर जिल्हा आहे. आमचा धर्म महाराष्ट्र आहे, अशा शब्दात राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे विरोधकांचा खरपूस समाचार घेताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट केले.
ते म्हणाले, दोन दिवसांपूूर्वी या चांदा क्लब ग्राऊंडवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचून दाखविला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाची कलम काढण्याचा उल्लेख आहे. भारतावर पाकिस्तानच्या चंद्राचा झेंडा फडकावा अशी व्यवस्था काँग्रेस करीत आहे. राहुल गांधी पक्षाचा जाहीरनामा वाचत होते आणि काँग्रेसचे नेते खोटी आश्वासने देत होती, असा चिमटाही यावेळी त्यांनी काढला.
भाजप-शिवसेना-रिपाइं युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ येथील चांदा क्लब ग्राऊंडवर रविवारी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे ते येथे येऊ शकले नाही, मात्र निवडणुकीत भाजपचे चंद्रपूर व गडचिरोलीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर ते जनतेचे आभार मानण्यासाठी येणार असल्याचा शब्द त्यांनी दिल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी मंचावर युतीचे उमेदवार हंसराज अहीर, आमदार अनिल सोले, आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व संदीप गिºहे, डॉ. अशोक जिवतोडे, अशोक घोटेकर, सिद्धार्थ पथाडे यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी हरीश शर्मा, आमदार नाना श्यामकुळे, अशोक पथाडे, अशोक जिवतोडे, संजय देवतळे, आमदार संजय धोटे, डॉ. एम.जे. खान यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसच्या उमेदवारावर सडकून टिका केली.

धानोरकर हा अवैध धंद्यांची पाठराखण करणारा नेता - नितीन मत्ते
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते हे आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले, आमच्या शिवसेनेतून पळून जावून काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या बाळू धानोरकरांची १५ वर्षे संगत होती. धानोरकरांनी गेल्या साडेचार वर्षांच्या आमदारकीत केलेल्या प्रत्येक कामांची विधानसभेत लक्षवेधी होऊ शकते. त्यांनी अवैधधंद्यांना पाठबळ देण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. अवैध धंद्याची पाठराखण करणारा नेता आहे, अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. अवैध धंद्याला प्रोत्साहित करणाऱ्या नेत्याला निवडून द्यायचे की सामान्य माणसाच्या पाठीशी उभ्या राहणाºया नेत्याला निवडून द्यायचे हे जनतेने ठरवावे, असे आवाहनही नितीन मत्ते यांनी आपल्या भाषणातून केले. धानोरकरांनी वरोरा-भद्रावती मतदार संघात काय काम केले हे जनतेला दाखवावे, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
अमित शहा आलेच नाहीत
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांच्यासाठी चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.), रासप महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या निवडणूक प्रचारार्थ चंद्रपूर येथील पटांगणावर जाहीर सभा होणार होती. मात्र ऐनवेळी अमित शहा येऊ न शकल्याने मतदारांचा हिरमोड झाला. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे चंद्रपुरात येत असल्याने सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. सायंकाळी ५ वाजतापासून चांदा क्लब ग्राऊंडवर कार्यकर्ते व नागरिक गोळा होऊ लागले. सुमारे आठ हजार नागरिकांची उपस्थिती झाली. मात्र ऐनवेळी अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची वार्ता सभास्थळी पोहचली. त्यामुळे अमित शहा यांना ऐकण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला. कुणी तांत्रिक कारण तर कुणी त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे कारण पुढे करीत होते. नेमके कारण अखेरपर्यंत सांगितले नाही.

Web Title: Our caste Chandrapur is our religion Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.