‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 07:13 PM2019-03-13T19:13:23+5:302019-03-13T19:15:51+5:30

महिला प्रधान या प्रत्येक चित्रपटाची कथा एकमेकांपेक्षा जेवढी वेगळी आहे तेवढाच प्रभावशाली चित्रपटाचा संदेश आहे, जो समाज आणि लोकांना सरळ जोडतो. आगामी काळातही प्रेक्षकांना अशाच वेगवेगळ्या आशयावर महिला प्रधान चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.

Festival of 'ladies' films! | ‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

googlenewsNext

रवींद्र मोरे 

बॉलिवूडमध्ये महिलांवर आधारित बरेच चित्रपट बनविण्यात आले आहेत. ज्यात 'मदर इंडिया', 'दामिनी', 'लज्जा', 'मॉम' आणि 'पिंक' शिवाय अनेक चित्रपटांचा समावेश आहे. महिला प्रधान या प्रत्येक चित्रपटाची कथा एकमेकांपेक्षा जेवढी वेगळी आहे तेवढाच प्रभावशाली चित्रपटाचा संदेश आहे, जो समाज आणि लोकांना सरळ जोडतो. आगामी काळातही प्रेक्षकांना अशाच वेगवेगळ्या आशयावर महिला प्रधान चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... 

* श्रद्धा कपूर- सायना नेहवाल बायोपिक
बॅडमिंटनच्या जगतात आपल्या प्रभावाने आपल्या कार्याचा झेंडा आंतरराष्ट्रीय  स्तरावर फडकवणारी सायना नेहवालवर आधारित चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करत आहे. यात सायनाची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारताना दिसणार आहे. श्रद्धा कपूर यासाठी सायनापासून बॅडमिंटन खेळण्याच्या टिप्सदेखील घेताना दिसत आहे. या अगोदर महिला खेडाळूच्या आयुष्यावर आधारित ‘मेरी कॉम’ हा चित्रपटही बनला आहे, ज्यात प्रियांका चोप्राने मेरी कॉमची भूमिका साकारली होती.  

* जान्हवी कपूर- गुंजन सक्सेना बायोपिक
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरदेखील एका बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय वायु सेनाची पहिली महिला पायलट गुंजन सक्सेनावर आधारित असेल. गुंजन १९९९ मध्ये युद्धादरम्यान कारगिलमध्ये तैनात होती. तेव्हा गुंजनने त्या युद्धात जे योगदान दिले त्यानुसार तिला ‘कारगिल गर्ल’ म्हणून ओळख मिळाली. याच आशयावर आधारित या बायोपिकमध्ये गुंजनच्या भूमिकेत जान्हवी दिसणार आहे.

 * दीपिका पादुकोण- छपाक 
अ‍ॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित बनत असलेल्या चित्रपटात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की, दीपिकाने या अटीवर हा चित्रपट साइन केला आहे की, नफ्यामध्ये तिचा बरोबरीचा हिस्सा असेल. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि अक्षय कुमारच्या या लीगमध्ये धडक देणारी ही पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने ही अट ठेवली आहे.  

* प्रियांका चोप्रा- द स्काई इज पिंक
प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट 'द स्काई इज पिंक'देखील महिलांवर आधारितच आहे. या चित्रपटात देसी गर्ल सुमारे तीन वर्षानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. या चित्रपटात प्रियांका शिवाय जायरा वसीम आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा आयशा चौधरीवर आधारित आहे जी ‘पल्मोनरी फाइब्रोसिस’ या आजाराने पीडित होती आणि तिचा मृत्यू वयाच्या १८ व्या वर्षी होतो.  

* भूमि-तापसी- सांड की आंख
हा चित्रपट देखील महिला प्रधान असल्याचे बोलले जात आहे. यात भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार असून याचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करत आहे. हा चित्रपट शूटर चंद्रो तोमर व प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे.  

Web Title: Festival of 'ladies' films!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.