- रवींद्र मोरे
आपल्या नजरेत एखादा अ‍ॅक्टर सुपरस्टार कधी बनतो, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. काहींच्या मते, बॉलिवूडमध्ये एखाद्या अ‍ॅक्टरच्या स्टारडमचा अंदाज त्याचे फॅन्स, फॅन फॉलोविंग, ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्याची कमाईद्वारा लावला जाऊ शकतो. मात्र एखाद्या दिग्गज स्टार्सची ओळख त्याची कमाई नसून त्याच्या चित्रपटांवर लावण्यात आलेल्या पैशांवरही निश्चित होते. जेव्हा दिग्दर्शक अ‍ॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्या चित्रपटावर पैसा खर्च करण्यास तयार असेल तर समजून घ्यावे की, हा अ‍ॅक्टर नसून स्टार आहे. आगामी काळात बॉलिवूडमध्ये सर्वात महागडे चित्रपट रिलीज होणार आहेत. सोबतच या स्टार्ससाठीही त्यांच्या करिअरमधला सर्वात मोठा चित्रपट असेल. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत...

* विक्की कौशल


या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा विक्की कौशलने हे सिद्ध करुन दाखविले की, तो आगामी काळाचा सुपरस्टार आहे. त्याच्या या चित्रपटाच्या कमाईने निर्मात्यांमध्ये हा विश्वास तर पक्का झाला की, विक्की पैसा वाया जाऊ देणार नाही. विक्की आगामी काळात करण जौहरच्या प्रोडक्शन हाऊसद्वारा बनत असलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ‘तख्त’ मध्ये दिसणार आहे. हा एक हिस्टोरिकल ड्रामा चित्रपट असेल. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, करिना कपूर, जान्हवी कपूर आणि भूमि पेडनेकर यांसारखे स्टार्सही असतील. हा चित्रपट विक्कीच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरू शकतो.

* रणबीर कपूर


गेल्या वर्षी रणबीर कपूरने संजू सारखा धमाकेदार चित्रपट दिला. १०० कोटीच्या बजेटचा हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधला सर्वात महागडा चित्रपट होता. मात्र रणबीर आता यापेक्षाही महागडा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये काम करत आहे. हा चित्रपट सुमारे १५० कोटीपेक्षा जास्त बजेटने बनत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे.

* श्रद्धा कपूर


श्रद्धा कपूर तिच्या करिअरमध्ये बऱ्याच मोठ्या चित्रपटात सहभागी झाली आहे. मात्र तिचा आगामी तेलुगु चित्रपट ‘साहो’ समोर सर्व चित्रपटांचा बजेट कमीच पडेल. ‘साहो’ सुमारे ३०० कोटीमध्ये बनणारा सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. यात श्रद्धा बाहुबली प्रभाससोबत दिसणार आहे.

* आदित्य रॉय कपूर


आशिकी 2 मध्ये कमाल दाखविल्यानंतर आदित्यचे करिअर जणू थांबूनच गेले होते, मात्र आगामी ‘कलंक’ चित्रपटाद्वारा आदित्यने पुनरागम केले आहे. ८० कोटी बजेटने बनत असलेला हा चित्रपट आदित्यच्या करिअरचा सर्वात महागडा चित्रपट आहे.

* अर्जुन कपूर


अर्जुन कपूरचा चित्रपट प्रवास तसा खास नाही आहे. गेल्या काळात काही फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अर्जुनला आता त्याचा आगामी चित्रपट ‘पानीपत’द्वारा विशेष अपेक्षा आहेत. सुमारे २०० कोटीच्या बजेटमध्ये बनत असलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक अ‍ॅक्शन चित्रपट असेल. या चित्रपटाकडून अर्जुनला जेवढ्या अपेक्षा आहेत तेवढ्याच अपेक्षा निर्मात्यांना अर्जुन कडून आहेत.


Web Title: bollywood-actors-whose-next-releases-are-also-their-most-expensive-films
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.