यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद
By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2022 14:57 IST2022-09-12T14:54:13+5:302022-09-12T14:57:02+5:30
जिल्ह्यात सरासरी ७० मिमी पाऊस

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद
यवतमाळ : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७०.३ मिमी पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक ११५.२ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब झाले असून उरलीसुरली पिकेही पाण्यात गेली आहे.
यंदा जून महिन्यातच जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा सोसावा लागला. त्यानंतर जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंतही अधूनमधून सुरूच होता. सोमवारी सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात ५७.७, बाभूळगाव ७८.५, कळंब ६५.६, दारव्हा ९९.९, दिग्रस ५६.४, आर्णी ११५.२, नेर ८५.५, पुसद २६.७, उमरखेड ५६.८, महागाव ५९.१, वणी ९०.६, मारेगाव ५७.१, झरी जामणी ७९.३, केळापूर ८४.६, घाटंजी ७६.२ आणि राळेगाव तालुक्यात ५६.९ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी दुपारीही यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस सुरूच होता.
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून विविध प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूस, अरुणावती, गोकी, वाघाडी, सायखेडा आणि बोरगाव हे सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. तर अडाण प्रकल्पात ८८.५५, अधरपूस ८७.२५ आणि बेंबळा प्रकल्पात ७८.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.