Lok Sabha Election 2019; प्रचारात उतरलेय येडे आणि धोटे कुटुंबीय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:25 PM2019-04-07T22:25:15+5:302019-04-07T22:26:31+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे.
कुटुंब रंगलंय राजकारणात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे.
प्रहार जनशक्ती संघटनेच्या उमेदवार वैशाली येडे यांची उमेदवारी सुरूवातीपासून चर्चेत आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी रक्तदान करून अर्ज दाखल केला. प्रचाराचा नारळ फोडताना देशी दारूच्या दुकानापुढे दुध वाटून प्रचार सुरू करण्यात आला. गावोगावी प्रचार करताना त्यांची नातेवाईक मंडळी आणि ग्रामस्थ गावोगावी फिरत आहेत. यामध्ये आई-वडील, सासू-सासरे, दीर-भावजया, चुलते यांचा समावेश आहे.
वैशाली येडे। प्रहार
वैशाली येडे या प्रहार जनशक्ती संघटनेकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या स्थितीत त्यांच्या प्रचारकार्यात सासर आणि माहेरची मंडळी मदतीसाठी काम करीत आहे.
वडील । माणिकराव रामराव धोटे
वैशाली येडे यांचे पती वारले आहे. कुटुंबाची जबाबदारी त्या स्वत: पार पाडत आहे. राजकारणापासून हे संपूर्ण कुटुंब कोसो दूर आहे. वैशाली यांचे वडील माणिकरावांना राजकारणाचा गंध नाही. मात्र मुलगी रिंगणात असल्याने पती-पत्नी दोघेही घरोघरी जाऊन प्रचाराचे काम करीत आहे.
नातेवाईकांची फळीच
सासरे, सासू, भासरे, जावा, गावातील मंडळी, सख्खे-चुलत असे सारे नातेवाईक आपल्या गावात वैशालीताईचा प्रचार करीत आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी सर्व नातेवाईकांचीच कार्यकर्ते म्हणून फळी तयार झाली आहे.
शिट्टी वाजवून अनोखा प्रचार
वैशाली येडे यांचा अनोखा प्रचार सुरू आहे. त्यांच्याकडे वाहन नसले तरी शिट्ट्या आहेत. गावामध्ये शिट्ट्या वाजवून लोकांना गोळा करण्याचे काम करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहे.
झोळी पसरवून मदत
निवडणुकीसाठी लागणारा पैसा या उमेदवाराकडे नाही. यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रचार करताना झोळी पसरून मदत गोळा करण्याचे काम कार्यकर्ते करीत आहे. यामुळे हा अनोखा उमेदवार गावात चर्चेचा विषय झाला आहे.