EVM machine in Yavatmal district fell into the truck | यवतमाळ जिल्ह्यात ईव्हीएम मशीन ट्रकमधून पडली
यवतमाळ जिल्ह्यात ईव्हीएम मशीन ट्रकमधून पडली

ठळक मुद्देहिंगोली लोकसभा शेंबाळपिंपरीनजीक घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनच्या पेट्या उमरखेड येथून हिंगोलीकडे नेताना ट्रकमधून एक मशीन ठेवलीली पेटी रोडवर पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरीनजीक उघडकीस आली. यामुळे प्रशासनाची काहीकाळ तारांबळ उडाली होती.
हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातही गुरुवारी मतदान झाले. शुक्रवारी उमरखेड येथून सर्व ईव्हीएम मशीनच्या पेट्या ट्रकने (क्र.एम.एच.२६/ए.डी.८३६९) हिंगोली येथे पोहोचविल्या जात होत्या. शेंबाळपिंपरीनजीक या ट्रकमधून अचानक ७० क्रमांकाची ईव्हीएम मशीनची पेटी खाली पडली. मात्र याबाबत चालकाला काहीही कळले नाही. या ट्रकमागे काही अंतरावर पोलीस व महसूल विभागाची वाहने होती. त्यांच्या नजरेस ही बाब आली. त्यांनी लगेच ट्रक घेऊन चालकाला परत बोलविले. त्यानंतर ७० क्रमांकाची पेटी ट्रकमध्ये ठेवण्यात आली.
ईव्हीएम मशीन पेट्या वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये मागे कुणीही बसलेले नव्हते. विशेष म्हणजे, ताडपत्रीला दोरी व्यवस्थित बांधलेली नव्हती. त्यामुळे पेटी रोडवर आदळल्याचे स्पष्ट होते. पेटी डांबर रोडवर आदळल्याने ईव्हीएमचे कंट्रोल युनिट निकामी तर झाले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या घटनेने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

शेंबाळपिंपरीनजीक ईव्हीएम मशीन पेटी डांबर रोडवर पडली. ही घटना खरी आहे. मात्र त्यातील ईव्हीएम मशीन आरक्षित असल्याने ती रिकामी होती.
- स्वप्निल कापडणीस
उपविभागीय अधिकारी, उमरखेड


Web Title: EVM machine in Yavatmal district fell into the truck
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.