अपर जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही करून आदेश काढला, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 17:15 IST2022-04-23T17:11:31+5:302022-04-23T17:15:54+5:30
मंडळ अधिकाऱ्याच्या समयसूचकतेने हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही करून आदेश काढला, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मारेगाव (यवतमाळ) : आदिवासींची भोगवट दोनच्या शेती विक्रीसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बोगस आदेश काढला. त्याद्वारे शेतीच्या विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या समयसूचकतेने हा प्रकार उघडकीस आला. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
रामा बापुराव टेकाम (वय ६०) रा.टाकळखेडा, बाजीराव बापुराव टेकाम (वय ६०) रा. सुर्ला. ता. झरी, दिलीप विश्वनाथ कोडापे (वय ५१) रा.बामणी जि.चंद्रपूर, मच्छिंद्र वासुदेव नन्नावरे (वय ४३) रा.शेगाव खुर्द (ता.वरोरा), महेश ज्ञानेश्वर हनवटे (वय ३०) रा. बोर्डा (ता.वरोरा), ज्ञानेश्वर विठ्ठलराव हनवटे (६२) रा.बोर्डा वरोरा अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मंडळ अधिकारी मिलिंद भीमराव घट्टे यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात भादंवि ३९२, ४१९, ४२०, ४२१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
झरी तालुक्यातील सुर्ला येथील चार वारसान असलेल्या आदिवासी शेतकऱ्याची आठ एकर शेतजमीन विक्री करण्याचा व्यवहार करण्यात आला. आदिवासीची भोगवट क्रमांक दोनची जमीन खरेदी-विक्री करायची असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात जमीन खरेदी करणारे व घेणाऱ्या सहाही आरोपीनी संगनमत करून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून १५ जानेवारी २०२० रोजी खोटा आदेश तयार केला. तसेच खोटा दस्तावेज जोडून भोगवट क्रमांक दोनच्या जमिनीचा खोट्या दस्तावेजाच्या आधारे खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला.
आदिवासींच्या शेताची खोट्या कागदपत्राच्या आधारे विक्री झाल्यानंतर हे प्रकरण फेरफार घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे पोहचले. मात्र कागदपत्र पाहिल्यानंतर मंडळ अधिकारी मिलिंद भीमराव घट्टे यांना संशय आला. त्यांनी खोलात जाऊन कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हे गौडबंगाल उजेडात आले. जमीन विक्री परवानगीचा शासन आदेश खोटा असल्याची बाब मंडळ अधिकारी मिलिंद घट्टे यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. गेल्या काही वर्षांपासून मारेगाव व झरी तालुक्यातील आदिवासींच्या शेतीचे खोटे दस्तावेज बनवून आदिवासीच्या शेती हडपण्याचा प्रकार सुरू आहे.