बविआची निर्विवाद सत्ता महायुती रोखणार का? बविआ-मविआ एकत्र आल्याने होणार थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:57 IST2025-12-24T07:57:03+5:302025-12-24T07:57:23+5:30
अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जागावाटप निश्चित झालेले नाही, बविआ-मविआने मनसेलाही घेतले सोबतीला

बविआची निर्विवाद सत्ता महायुती रोखणार का? बविआ-मविआ एकत्र आल्याने होणार थेट लढत
- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई-विरार : महापालिकेवरील बविआची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजप-शिंदेसेनेने महायुतीत लढण्याचे जाहीर केले आहे. तर विधानसभेत भाजपला मिळालेले यश पाहता त्यांना रोखण्यासाठी एकहाती सत्ता असणाऱ्या बविआने मविआसोबत युती जाहीर केल्याने निवडणुकीत महायुती की नवी आघाडी बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बविआ व मविआने मनसेलाही घेतले आहे. त्यामुळे मनसेला काही जागा सोडाव्या लागतील. मराठी पट्ट्यात मनसेचे तर ख्रिश्चन व मुस्लीम पट्ट्यात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांना जास्त जागा सोडाव्या लागतील. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही.
एमआयएमचीही तयारी
जिल्ह्यात नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांना आव्हान देत स्वतंत्रपणे निवडणुका लढविलेले महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना वसई-विरार महापालिका काबीज करण्यास एकत्र आले. एमआयएमनेही निम्म्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्याचा परिणाम कोणावर होणार याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी प्रचारात कोणते मुद्दे ठरू शकतात निर्णायक?
शहरात दररोज होणारी वाहतूककोंडी, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, उड्डाणपूल, अनधिकृत बांधकामे, शास्ती घरपट्टी, रस्ते, गटारे, पावसाळ्यात शहरात साचणारे पावसाचे पाणी, फेरीवाला धोरण, वाहने पार्किंग समस्या आदी मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत बविआचे तिन्ही आमदार झाले होते पराभूत
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बविआने महाविकास आघाडी किंवा मनसेसोबत युती न करता स्वतंत्र निवडणूक लढविल्याने त्यांचे तिन्ही आमदार पराभूत झाले होते. वसई विधानसभेतून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना ३२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडीसह मनसेला एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले.
तब्बल १० वर्षांनी होतेय निवडणूक
२००९ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली. सन २००९ आणि त्यानंतर २०१५ मध्ये ११५ नगरसेवक पदांसाठी वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्यात आली होती. २०२० साली निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र तेव्हा कोरोनामुळे निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे.