Will the electorate change the district? | Maharashtra Election 2019: मतदार जिल्ह्यात बदल घडवणार का?
Maharashtra Election 2019: मतदार जिल्ह्यात बदल घडवणार का?

- हितेन नाईक

पालघर : भाजप - सेनेतील अंतर्गत धुसफूस, वाढलेली दरी आणि बाहेरून आयात केलेले उमेदवार यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी पाहता २०१४ ची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात दिसणार की नाही, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप - सेनेला पालघर, डहाणू, विक्रमगड या तीन जागा मिळवण्यात यश आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा वसई या सहा मतदारसंघात गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

डहाणू मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे विरुद्ध माकपचे विनोद निकोले यांच्यातच खरी लढत आहे. इथे धनारे यांच्याविरोधात मोठी नाराजी असून याचा फटका त्यांना बसतो का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. येथे ६०.९६ टक्के म्हणजे १ लाख ६५ हजार ८६५ इतके मतदान झाले आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाआघाडीला ८ हजार १४७ मते जास्त मिळाली होती. यावेळी निकोले यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीची साथ मिळाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीनंतरच्या सहा महिन्यांमध्ये मतदारसंघात विशेष घडामोडी घडल्या नसल्याने निकोले हे सत्ताधाऱ्यांना धक्का देऊ शकतात अशी चर्चा आहे.

विक्रमगडमध्येही १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. हेमंत सवरा आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांच्यात होणार आहे. पालघर जिल्ह्यात या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६८.५१ टक्के एवढे मतदान झाले आहे. आदिवासी विकासमंत्री आणि पालकमंत्री म्हणून विष्णू सवरा यांच्या रूपाने या विधानसभा क्षेत्राला वजनदार नेते मिळाले असतानाही या मतदारसंघाचा विकासच झाला नसल्याचे वास्तव विरोधकांनी मतदारापुढे मांडण्यात यश मिळवले आहे. इथे भाजपत झालेली बंडखोरी वरवर शमल्यासारखी वाटत असली आतून ही आग धुमसते आहे.

तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेत असलेली धुसफूस भाजप उमेदवाराला धोकादायक ठरू शकते. शिवसेनेचे जि.प. सदस्य प्रकाश निकम हे २०१४ च्या निवडणुकीत दोन नंबरवर होते. सध्या ते सेनेतून भाजपमध्ये गेले असले तरी भविष्यातील उमेदवारीच्या दाव्याचे गणित पाहता त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

पालघरमध्ये एकूण पाच उमेदवार रिंगणात असून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि काँग्रेसचे योगेश नम किंवा वंचित आघाडीचे विराज गडाग यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदार संघात २३ गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्काराचा जास्त प्रभाव सेनेच्या उमेदवारांवर पडण्याची शक्यता असून नोटा चा वापरही जास्त झाल्याची चर्चा आहे. इथे २ लाख ७३ हजार ९९४ मतदार असून अवघे ४७.११ टक्के मतदान झाले आहे. हे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी भाजप - सेनेमधील दुही आणि बहिष्काराचे लोण, सक्षम उमेदवार नसल्याचे कारण देत उमेदवारांनी दाखवलेली उदासीनता, या बाबींवर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

बोईसर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असून भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांनी मुख्यमंत्र्यांच्या इशाºयानंतरही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सेनेच्या नाकी नऊ आणले आहेत. शेवटच्या दोन दिवसात त्यांनी मारलेला जोर आणि भाजपकडून मिळालेली आर्थिक रसद यामुळे ते मुसंडी मारू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे अपक्ष (भाजप बंडखोर) संतोष जनाठे आणि सेनेच्या विलासर तरे यांच्या लढतीत बविआचे राजेश पाटील बाजी मारतात की पक्ष बदल केल्यानंतर आणि विलास तरे यांना निष्क्रिय उमेदवार ठरविल्यानंतरही मतदार त्यांना पसंती देतात की अन्य पर्याय निवडतात याची उत्सुकता आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजप व सेना उमेदवार स्वतंत्र लढले असतानाही बविआ चे उमेदवार विलास तरे निवडून आले होते. यावेळी ते सेनेतून लढत असले तरी त्यांना भाजपमधून पूर्ण साथ मिळाली नसल्याने सेनेच्या तंबूत घबराट आहे. येथे एकूण ६७.५७ टक्के मतदान झाले आहे. नालासोपारा मतदारसंघात बविआ एकतर्फी जिंकून येत असली तरी यावेळी सेनेने प्रदीप शर्मा या एका सेवानिवृत्त पण वादग्रस्त पोलीस अधिकाºयाला उमेदवारी देत आव्हान उभे केले होते.

सेना - भाजपतील बंडाळी भोवणार?

नालासोपाऱ्यात सेनेच्या मदतीला भाजप पूर्ण ताकदीनिशी नसल्याने सेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही जागा भाजपला हवी होती. मात्र, ती शिवसेनेकडे गेल्याची नाराजी होती. याचा फटका प्रचारातही बसलेला दिसला.

वसई मतदारसंघात बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा सामना काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या विजय पाटील यांच्याशी होणार आहे. इथल्या महानगर पालिकेत बविआची एकहाती सत्ता असून इथे सेनेची पक्षबांधणी मजबूत नाही.

Web Title: Will the electorate change the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.