हळदी-कुंकवाच्या आडून मतदारांना मिळतात भेटवस्तू; मिरा-भाईंदरची आचारसंहिता, भरारी पथके गेली कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:02 IST2025-12-25T09:01:54+5:302025-12-25T09:02:10+5:30
आचारसंहितेचे उल्लंघन होत नसल्याची खात्री करण्यासाठी भरारी पथके, फिरती पथके नेमली जातात; परंतु ही पथके तसेच पोलिस स्वतःहून काहीच बघत नाहीत.

हळदी-कुंकवाच्या आडून मतदारांना मिळतात भेटवस्तू; मिरा-भाईंदरची आचारसंहिता, भरारी पथके गेली कुठे?
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरा रोड : महापालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, त्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून विविध पथके नेमलेली आहेत; परंतु मिरा-भाईंदरमध्ये हळदी-कुंकू सोहळ्यापासून विविध कार्यक्रमांच्या आड मतदारांना प्रलोभने दाखवत भेटवस्तू दिल्या जात आहेत. मतदारांना भुलविण्यासाठी हे प्रकार चालवले असताना पोलिस, आचारसंहिता पथक, भरारी पथके गेली कुठे? असा सवाल विविध पक्ष आणि व इच्छुक उमेदवार करत आहेत.
आचारसंहितेचे उल्लंघन होत नसल्याची खात्री करण्यासाठी भरारी पथके, फिरती पथके नेमली जातात; परंतु ही पथके तसेच पोलिस स्वतःहून काहीच बघत नाहीत. त्यांच्याकडे कोणी तक्रार केल्यास राजकीय दबावापोटी कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते किंवा पथके वेळेत पोहोचत
नाहीत व पुरावे नष्ट करू देतात, अशा तक्रारी पूर्वीच्या निवडणुकांमध्ये झालेले आहेत.
जाती-धर्म आणि प्रांत आधारे स्नेहसंमेलने
मिरा-भाईंदरमध्ये आचारसंहिता लागू होऊनदेखील काही राजकारणी व पक्षांनी विविध संस्थांच्या नावाखाली हळदी-कुंकू, आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रम, सोसायटी कार्यक्रम, जाती-धर्म आणि प्रांत आधारे स्नेहसंमेलने चालवली जात आहेत. त्यामध्ये सर्रासपणे राजकीय पक्ष व नेत्यांसह इच्छुकांची नावे टाकून त्यांची भाषणे आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये उघडपणे मते मागितली जात आहेत. नाश्ता, जेवणाची सोय केली जात आहे.
महिला मतदारांकडे उमेदवारांचे विशेष लक्ष
महिला मतदारांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांना सध्या ठिकठिकाणी इच्छुक उमेदवार, राजकीय नेते हे हळदी-कुंकू ठिकठिकाणी आयोजित करत आहेत. त्याला वेगवेगळ्या संस्थांचे लेबल लावले जात असली तरी निमंत्रण, फलकांवर राजकीय पक्षाच्या राजकारणी, इच्छुक आदींची नावे असतात. हळदी-कुंकूमध्ये महिलांना भेटवस्तू वाटल्या जाताहेत.