वसई-विरारच्या वॉर्ड आठमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे; ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:27 IST2025-12-30T08:26:53+5:302025-12-30T08:27:19+5:30
५० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेले १० प्रभाग आहेत.

वसई-विरारच्या वॉर्ड आठमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे; ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक विभागामार्फत तयारी सुरू झाली आहे. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण व मतदारयाद्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक आता विभागाने प्रभागानुसार मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २९ प्रभागांमध्ये १,४३२ मतदान केंद्रे असतील. सर्वाधिक मतदान केंद्रे ही प्रभाग केंद्र आठमध्ये असणार आहे. त्यात एकूण ६३ मतदान केंद्रे आहेत. ५० पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेले १० प्रभाग आहेत.
वसई-विरार महापालिकेतील सर्वात कमी २९व्या प्रभागात ३४ मतदान केंद्रे असणार आहेत. एकूण २९ प्रभाग असून, ११५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या २९ ते ५१ हजारांदरम्यान ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २, ९, २२, ११, १३, १९, ८, १८, २१ आणि २७यांमध्ये ५० पेक्षा जास्त मतदान केंद्रांचा समावेश आहे.
वसई-विरारला ११५ जागांसाठी आतापर्यंत २,९५२ अर्ज विक्री
वसई विरार मनपाच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत असून, २३ डिसेंबरपासून अर्ज विक्री आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. पाच दिवसांत वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी २,९५२ अर्जाची विक्री झाली आहे. सोमवारी ५५१ अर्जाची विक्री झाल्याची माहिती मनपा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सोमवारी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि २२ मधून प्रत्येकी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.