निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:57 IST2026-01-01T08:57:49+5:302026-01-01T08:57:49+5:30
मुख्य निवडणूक निरीक्षकांनी वसई-विरार महापालिका निवडणूक तयारीबाबत केली पाहणी

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि काटेकोर पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी तत्पर राहा
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक प्रदीप पी. यांनी बुधवारी महापालिकेला भेट दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व काटेकार पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत निवडणूक निरीक्षक उपेंद्र तामोरे हे देखील उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयात मुख्य निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीस आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत, तसेच आजपर्यंत केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती सादर केली.
महापालिका प्रभाग रचना, वॉर्ड संख्या, मतदारयाद्या, प्रभागनिहाय तयार केलेले निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये, मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील उपाययोजना, वाहन व्यवस्था, नियुक्त कर्मचारी, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेले व येणारे प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, ईव्हीएम उपलब्धता व त्यांचे वाटप तसेच स्वीकृती, मतदार जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम, आदर्श आचारसंहिता राबविण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, नेमलेली विविध पथके इत्यादी संपूर्ण माहिती सांगण्यात आली. तसेच माहितीचे पीपीटी प्रेझेन्टेशन सादर करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत राबविण्याच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षकांनी काही आवश्यक त्या सूचना बैठकीत दिल्या.
मतमोजणीच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन
बैठकीनंतर मुख्य निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या स्ट्रॉग रूमची पाहणी केली. तसेच मतमोजणीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेट देत तेथील कामकाज तयारी विषयी माहिती घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (निवडणूक) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, मुख्य लेखा परीक्षक दिनकर जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.