विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:39 IST2025-12-30T12:38:32+5:302025-12-30T12:39:02+5:30
VVCMC Election 2026: काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गट एकाकी पडला. तसेच महायुतीतील एका मित्रपक्षाने विरोधकांना पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे.

विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
VVCMC Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच राज्यभराप्रमाणे वसई-विरार महानगरपालिकेतही जागावाटपावरून विरोधकांमध्ये बिनसल्याचे पाहायला मिळत असून, ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेत सुरुवातीला भाजपाविरोधात सगळे विरोधक एकत्र आले होते. महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी यांनी एकत्र येऊन निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला होता. मनसेलाही या आघाडीत सामील करून घेण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होत्या. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावर अखेरपर्यंत एकमत होऊ शकले नाही. प्रभागनिहाय जागांच्या वाटपात मतभेद कायम राहिल्याने उद्धवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
रामदास आठवलेंचा बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा
उद्धवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले असून, अनेकांनी अर्जही दाखल केले आहेत. तर दुसरीकडे आता बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसेने अद्याप अधिकृत जागावाटप जाहीर केले नसले तरी मनसेला ३ आणि काँग्रेसला ८ जागा सोडण्याचा बहुजन विकास आघाडीचा विचार असल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडीत महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना राजकीयदृष्ट्या एकाकी पडली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. वसई-विरारमध्ये ठाकरे गट सुमारे ८० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, यानंतर अंतिम यादी आकडेवारी समोर येऊ शकणार आहे.