“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:55 IST2025-12-30T11:52:54+5:302025-12-30T11:55:44+5:30
VVCMC Election 2026: विधानसभेला ठाकूर पिता-पुत्रांचा पराभव झाला होता. आता वसई-विरारमधील सत्ता राखण्याचे आव्हान बहुजन विकास आघाडीसमोर असणार आहे.

“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
VVCMC Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच वसई विरार महानगरपालिकेत आमचाच विजय होणार असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता वसई-विरार महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीसमोर असणार आहे. वसई-विरार महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मनसेलाही महाविकास आघाडीत घेण्यात आले आहे. यानंतर आता वसई-विरार महापालिकेत विजयाचा निर्धार हितेंद्र ठाकूर यांना केला आहे.
वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार
आम्ही वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. जरी काही उमेदवार पक्ष सोडून गेले, तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही. आमच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांचा एक मजबूत आणि समर्पित गट आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा विजय मिळवण्याचा विश्वास आहे, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाने सुरुवातीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होत्या. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावर अखेरपर्यंत एकमत होऊ शकल्याचे समजते.