महापौरपदासाठी नालासोपारा मतदारसंघ ठरणार किंगमेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:27 IST2026-01-13T08:27:16+5:302026-01-13T08:27:16+5:30
नालासोपारा मतदारसंघ वसई-विरार पालिकेतही महापौरपदाच्या शर्यतीतही किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापौरपदासाठी नालासोपारा मतदारसंघ ठरणार किंगमेकर
मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा :वसई विरार महापालिकेत ११५ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यापैकी १७ प्रभाग आणि ६८ नगरसेवक एकट्या नालासोपारा मतदारसंघात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेला नालासोपारा मतदारसंघ वसई-विरार पालिकेतही महापौरपदाच्या शर्यतीतही किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वसई विरार महापालिका क्षेत्रात वसई, नालासोपारा आणि बोईसर तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. विशेषतः नालासोपारा हा सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. या भागात मराठी मतदारांसह उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन असे सर्वधर्मीय राहतात. त्यामुळे इथली राजकीय लढत अधिकच रंगतदार ठरत आहे. वसई विरार महापालिकेच्या २९ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे केवळ एकट्या नालासोपारा मतदारसंघात येत असून, ११५ पैकी ६८ नगरसेवक याच भागातून निवडून येणार आहेत. म्हणजेच महापौरपदाची चावी नालासोपाऱ्याच्या हातात असण्याची शक्यता पाहता सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे लक्ष या मतदारसंघावर अधिक केंद्रित केले आहे.
नालासोपारा मतदारसंघात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे त्यांची मते आपल्या पारड्यात पडावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. १७ प्रभाग, ६८ नगरसेवक नालासोपारा मतदारसंघात आहेत.
सर्व पक्षांकडून लक्ष केंद्रित
कोणी उत्तरभारतीय मतदारांच्या १ समस्या सोडवण्याचे आश्वासन देतेय, कोणी मनधरणीचा प्रयत्न करतेय. भाजप आणि बविआ अशा दोन पक्षांत या भागात राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या भागात वर्चस्व मिळविले.
भाजपचा या ठिकाणी वरचष्मा राहिला होता. तर दुसरीकडे बविआनेही येथील उत्तर भारतीय मतदारांची संख्या पाहता उत्तर भारतीय उमेदवार रिंगणात उभे करून या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
कोणत्या मतदारसंघात किती प्रभाग ?
नालासोपारा मतदारसंघ : १, २, ३, ४, ५, ६, ७, १९, १०, ११, १२, १४, १५, १६, १७, २२, २१ (एकूण १९ प्रभाग)
वसई मतदारसंघ : १३, २३, २४, २५, २६, २७, २८, २९ (एकूण ८ प्रभाग)
बोईसर मतदारसंघ : ८, १८, १९, २० आणि २१ चा काही भाग (एकूण ४ प्रभाग)