वसई-विरारच्या २९ हजार दुबार मतदारांचा लागेना थांगपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:05 IST2026-01-14T11:05:25+5:302026-01-14T11:05:25+5:30
दुबार मतदान करणार नाही, ५ हजार मतदारांचे हमीपत्र

वसई-विरारच्या २९ हजार दुबार मतदारांचा लागेना थांगपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार दुबार मतदारांपैकी २९, १२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता महापालिकेच्या पथकांना सापडलाच नाही. तर २३,२५२ मतदारांचा शोध पालिकेमार्फत घेण्यात आला आहे. यातील ५,१५८ मतदारांकडून दुबार मतदान करण्यात येणार नाही अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. तर उर्वरित मतदारांकडून मतदानाच्या दिवशीच हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
दुबार मतदारांबाबत संपूर्ण राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या प्रत्येक मतदारांच्या नावासमोर दोन स्टार दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे दुबार मतदारांचा शोध घेऊन, कोणत्याही एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असून अशा प्रकारचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. ज्यांच्याकडून लिहून घेतले नसेल अशांसाठी मतदानाच्या दिवशीसुद्धा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
२९,१२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता पालिकेच्या पथकांना सापडलाच नाही. २३,२५२ मतदारांचा शोध महापालिकेमार्फत घेण्यात आला आहे.
केंद्रावर लिहून घेणार हमीपत्र
- १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहित धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार वसई-विरार महापालिका हद्दीत ११ लाख २६ हजार ४०० मतदार नोंद आहेत. यामध्ये ५२ हजार ३७९ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
- त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दुबार मतदारांपैकी पालिकेला २३,२५२ - मतदारांचा पत्ता शोधण्यात यश आले.
- त्यापैकी केवळ ५,१५८ मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. मात्र उर्वरित दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी त्याच केंद्रावर हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे, असे मनपाने सांगितले.