प्रस्थापितांसमोर बालेकिल्ला राखण्याचे, तर महायुतीपुढे वर्चस्व गाजवण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:46 IST2026-01-05T10:46:15+5:302026-01-05T10:46:15+5:30
ही ‘अस्तित्वाची लढाई’ वसई-विरारच्या भविष्याची दिशा ठरवणारी असेल.

प्रस्थापितांसमोर बालेकिल्ला राखण्याचे, तर महायुतीपुढे वर्चस्व गाजवण्याचे आव्हान
वसई-विरार, मंगेश कराळे, प्रतिनिधी
जवळपास दहा वर्षांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक होत असून, येथील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ती खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई ठरत आहे. यावेळी प्रस्थापित सत्ताधारी आणि नव्याने पाय रोवू पाहणारे विरोधक यांच्यात काटे की टक्कर रंगणार आहे. ही ‘अस्तित्वाची लढाई’ वसई-विरारच्या भविष्याची दिशा ठरवणारी असेल.
यंदा वसई-विरार महापालिका जिंकण्याच्या उद्देशाने भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस व मनसेला सोबत घेऊन मैदानात उतरली आहे, तर उद्धवसेनेने वेगळी चूल मांडली आहे. त्यातच दहा वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने यंदाची निवडणूक लढवण्यासाठी माजी नगरसेवकांसह बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक होते; मात्र या युती, आघाड्यांमुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
अनेक वर्षे वसई-विरारवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीसमोर बालेकिल्ला राखण्यासह आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
मतदारांची नाराजी दूर करणे आणि केलेल्या कामांचा हिशोब देणे ही त्यांच्यासाठी मुख्य कसरत ठरणार आहे. बविआने ११५ पैकी ११३ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर दुसरीकडे, महापालिकेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी भाजप-शिंदेसेने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे.
प्रत्येकाने प्रभागागणिक मोर्चेबांधणी केल्याने प्रत्येक जागा मिळवण्यासाठी निकराची लढत होणार आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि शहरातील अनधिकृत बांधकामे या मुद्द्यांभोवतीच प्रचाराची राळ उडण्याची शक्यता आहे. तरुण मतदारांचा कल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे उमेदवारांना प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता उमेदवारांकडून पर्याय म्हणून सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते वसई-विरारमधील मतदार आता अधिक सजग झाला आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ दोन पक्षांमधील नसून, जुन्या वारसाचा आणि नवीन बदलाचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वसई-विरारच्या राजकीय आखाड्यात नेमके कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
लागले आहे.
११५ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात
वसई-विरार मनपा निवडणुकीत भाजप ९५, बविआ ११३, उद्धवसेना ८९, शिंदेसेना २७, वंचित ११, सपा ५, बसपा १२, राष्ट्रवादी अजित पवार १४, काँग्रेस ११, एमआयएम ८, उत्तर भारतीय विकास सेना ८, आप ६, अखिल भारतीय सेना १, रिपब्लिकन सेना १, जनता काँग्रेस १ आणि अपक्ष १४५ असे एकूण ११५ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात उभे आहेत.
स्वच्छता, पाणी, खड्डे, वाहतूक कोंडी हे निवडणुकीतील कळीचे प्रश्न आहेत. मोठ्या कालखंडानंतर निवडणूक होत असल्याने उमेदवारांकडू मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या नगरसेवकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.