बविआ आणि महाविकास आघाडीत चिन्हावरून पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:30 IST2025-12-23T10:29:29+5:302025-12-23T10:30:17+5:30
भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले आहेत.

बविआ आणि महाविकास आघाडीत चिन्हावरून पेच
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई-विरार पालिकेसाठी महाविकास आघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी समान चिन्हाच्या आग्रहामुळे त्यांच्यात पेच निर्माण झाला आहे. ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे ठाकूरांनी उद्धवसेनेसह काँग्रेसला सांगितले आहे. नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असा पर्याय महाविकास आघाडीने दिला आहे; परंतु यापैकी कशावरही अद्याप एकमत झालेले नाही.
भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले आहेत. मात्र, आता निवडणूक चिन्ह काय असावे, याबाबत पेच निर्माण झाला आहे. ४ पक्ष एकत्र असल्याने कोणाचेही अधिकृत चिन्ह न वापरता गोंधळ टाळण्यासाठी सर्व पक्षांनी समान चिन्हावर निवडणूक लढवावी, असे ठरले आहे. मात्र, समान चिन्ह काय असावे, त्यावरच या नव्या आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे.
बविआचे चिन्ह शिट्टी आहे आणि त्यावरच निवडणूक लढवावी, असा बविआ अध्यक्ष ठाकूरांचा आग्रह आहे. काँग्रेस आणि उद्धवसेना शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवायला तयार नाहीत. शिट्टी चिन्ह घेतले तर आम्ही बविआमध्ये विलीन झालो, असा समज होईल. ज्या शिट्टीला आजवर विरोध केला त्याच चिन्हावर मते कशी मागणार, अशी भूमिका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर यांची आहे.
...तर मतदारांपर्यंत पोहोचता येईल
पंजा हे चिन्ह घेण्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, नवीन चिन्ह घेतले तर मतदारांपर्यंत पोहोचता येणार नाही, अशी भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी मांडली. सध्या समान चिन्हाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे दोन्ही पक्षांनी सांगितले.