खंडणीप्रकरणी कामतवर गुन्हा, दोन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:00 IST2019-12-24T00:00:41+5:302019-12-24T00:00:44+5:30
राजेंद्र चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बदलापूर पश्चिम येथे इमारतीचे काम सुरू आहे

खंडणीप्रकरणी कामतवर गुन्हा, दोन अटकेत
बदलापूर : बदलापूरमधील बांधकाम व्यावसायिक, माजी नगरसेवक व मराठा क्रांती मोर्चाचे ठाणे जिल्हा समन्वयक राजेंद्र चव्हाण यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महेश कामत आणि त्याच्या दोन साथीदारांवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश बनसोडे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
राजेंद्र चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बदलापूर पश्चिम येथे इमारतीचे काम सुरू आहे. तुमची सोशल मीडिया आणि पेपरमधून बदनामी करतो, असे सांगून राजेश बनसोडे व एका अल्पवयीन मुलाने महेश कामत याच्या वतीने त्यांच्याकडे खंडणी मागितली. मात्र, राजेंद्र चव्हाण यांनी खंडणी देण्यास नकार दिला व या दोन्ही खंडणीखोरांना थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्याविरु द्ध रीतसर गुन्हा दाखल केला. महेश कामत याच्या सांगण्यावरूनच हे दोघे खंडणी उकळण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी सांगितले.
महेश कामत हा तडीपारी भोगलेला गुंड असून त्याच्यावर यापूर्वीही बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यांत खंडणीचे चार व इतर गुन्हे दाखल आहेत. तडीपार असताना खंडणी उकळण्याचा गुन्हा कामतवर दाखल आहे.