विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पोलिसांनी पकडले; एका आरोपीला अटक, ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 18:52 IST2024-03-01T18:52:10+5:302024-03-01T18:52:25+5:30
गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पेल्हार पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री पकडले.

विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पोलिसांनी पकडले; एका आरोपीला अटक, ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
(मंगेश कराळे)
नालासोपारा: गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पेल्हार पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री पकडले. पोलिसांनी एक आरोपीला अटक केले असून ११ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शुक्रवारी दिली. गुरुवारी रात्री पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त करत होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना माहिती मिळाली कि गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास एक इसम बोलेरो पिकअप वाहनाने बेकायदेशिरपणे अवैधरित्या दारु घेऊन गुजरात येथे विक्री करीता जाणार आहे. ही माहिती मिळाल्याने त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड यांना माहिती दिल्यावर त्यांनी बातमीची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशान्वये पेल्हारचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी बातमीच्या अनुशंगाने वाकणपाड्याच्या जायका हॉटेलच्या समोर सापळा रचून आरोपी लवकुश (४३) याला पिकअपसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेल्या बोलेरो पिकअपची तपासणी केल्यावर त्यात २ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचे न्यु टुबोर्ग क्लासिक विथ स्कॉच माल्टस कंपनीचे एकुण ६० बॉक्स त्यामध्ये १,४४० बियरचे टिन मिळून आले. असा एकुण ११ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पेल्हार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, संजय मासाळ, रवि वानखेडे, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, राहुल कपे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे.