मतदार यादीतील ‘घोटाळ्यां’वर निवडणूक अधिकारी निरुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:33 IST2025-12-23T10:32:28+5:302025-12-23T10:33:25+5:30
उत्तरे न मिळाल्याने मनपाचे पदाधिकारी व इतर बहिष्कार करत बाहेर पडताच प्रशासनाने विनंती करून थांबवले.

मतदार यादीतील ‘घोटाळ्यां’वर निवडणूक अधिकारी निरुत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरा रोड : मिरा-भाईंदर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या बैठकीत उपस्थितांनी केलेल्या मतदार यादीतील घोटाळे व अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. उत्तरे न मिळाल्याने मनपाचे पदाधिकारी व इतर बहिष्कार करत बाहेर पडताच प्रशासनाने विनंती करून थांबवले.
धर्माधिकारी सभागृहात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य यांची जाहीर बैठक बोलावली होती. बैठकीस आयुक्तांसह पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे उपस्थित हाेते.
बैठक मतदार यादीवरील चर्चेसाठी नसल्याचे उत्तर
काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल सावंत यांनी मतदार यादीतील प्रशासनाने केलेल्या गडबडीबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असे निदर्शनास आले की जर एखाद्या प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले तर निवडणूक अधिकारी यांना अधिकार आहेत ते सुधारणा करून पुरवणी यादी प्रसिद्ध करू शकतात. मात्र आम्ही अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांची भेट घेतली असता त्यांनी आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर दिल्याचा आरोप सावंत यांनी केला. ही बैठक मतदार यादीवर चर्चेसाठी नाही असे उत्तर यावर आयुक्तांनी दिले.