प्रचार थंडावला, प्रशासन सज्ज; वसई-विरार महापालिकेसाठी ८ हजार ६०० कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:58 IST2026-01-14T10:58:18+5:302026-01-14T10:58:18+5:30
३ हजार ७१३ पोलिसांची कुमक

प्रचार थंडावला, प्रशासन सज्ज; वसई-विरार महापालिकेसाठी ८ हजार ६०० कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकांसाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी बंद झाला. आता उत्सुकता आहे ती मतदान आणि निकालाची. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी वसई-विरार महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. वसई-विरारमध्ये ११५ जागांसाठी मतदान होत असून १३५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ६०० कर्मचारी सर्वच ठिकाणी तैनात केलेले असून, शहरात पोलिसांचाही कडक बंदोबस्त राहणार आहे.
मागील काही दिवसांपासून वसई-विरारमध्ये धडाडत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय कामांची लगबग गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरूच आहे. आता मतदान आणि मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. २९ प्रभागांतून मिळून ५४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ३१७ सेंटर असून १३५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी १५०० कंट्रोल युनिट आणि ४ हजार ३०० बॅलेट युनिट असणार आहे. प्रत्येक प्रभागानुसार नऊ स्ट्राँग रूम तर मुख्य एक स्ट्रांग रूम वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात असणार आहे. या होणार आहे. ठिकाणी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ५० सीटच्या ८४ बस, ३५ सीटच्या १६४ बस, २० सीटच्या २६ बस आणि १७सीटच्या १० बस अशा एकूण २८४ खासगी बस असणार आहेत. तसेच १३२ झोनल अधिकाऱ्यांसाठी १३२ चारचाकी वाहने आणि दिव्यांगांसाठी १२ वाहने असणार आहेत.
मतदान केंद्रांवरील सुविधा
पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हीलचेअर, मानक मतदान कक्ष, आवश्यक दिशादर्शक फलक अशी व्यवस्था मतदान केंद्रांवर असणार आहे. दिव्यांग मतदार, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेश
देताना प्राधान्य देण्यात येणार आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ २ व परिमंडळ ३ यांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २ पोलिस उपायुक्त, ५ सहायक पोलिस आयुक्त, २३ पोलिस निरीक्षक, १३१ पोलिस अधिकारी, १ हजार ८८६ पोलिस अंमलदार, १ हजार ३६६ होमगार्ड, १२० मसुब, २ एसआरपीएफचे २ प्लाटून आणि ७६ पोलिसांचे सेक्टर पेट्रोलिंग असणार आहे.
प्रभागात एक सखी केंद्र
मतदारांच्या रांगांचे व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी महापालिकेचे कर्मचारी मदत करणार आहेत. निवडणुकीसाठी आठ हजार तसेच सर्व प्रक्रिया राबविणारे ६०० असे एकूण ८ हजार ६०० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असणार असून, तेथील सर्व व्यवस्था महिला कर्मचारी पाहतील.