महिलांना ३ हजार, मेट्रो-रो-रो सेवा, ५० वर्षांची पाण्याची सोय; हितेंद्र ठाकूरांचा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:15 IST2026-01-13T12:14:25+5:302026-01-13T12:15:15+5:30
BVA Hitendra Thakur Manifesto For VVMC Election 2026: लोकशाही जपूया, विकास साधूया, असे आवाहन करत बहुजन विकास आघाडीने वसई-विरारकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

महिलांना ३ हजार, मेट्रो-रो-रो सेवा, ५० वर्षांची पाण्याची सोय; हितेंद्र ठाकूरांचा जाहीरनामा
BVA Hitendra Thakur Manifesto For VVMC Election 2026: महाराष्ट्राचे आजचे राजकारण पाहिले तर समृद्ध लोकशाहीकडून आपण एकाधिकार व हुकुमशाहीकडे प्रवास करीत आहोत, असे चित्र दिसते. विकासाभिमुख कामे करून सर्वसामान्य जनतेला सुसहय्य जीवन जगण्यासाठी लोकशाही जपूया, विकास साधूया. लोकशाही टिकवायची असेल तर या निवडणुकीत आपल्याला अतिशय सावधपणे, सूज्ञपणे व आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून विचारपूर्वक मतदान करावे लागणार आहे. सामान्यजनांचे जीवन आनंददायी आणि समृद्ध बनविण्याकरीता बहुजन विकास आघाडीने नागरी सुविधांबरोबरच सांस्कृतिक, कला-क्रीडा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन इत्यादी क्षेत्रातही भरीव असे काम केले आहे व यापुढेही हे कार्य असेच अविरत सुरूच राहणार आहे, असे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच बहुजन विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
यंदाची वसई-विरार महापालिकेची निवडणूक लक्षेवधी ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता वसई-विरार महानगरपालिकेत विजय मिळवणे आणि सत्ता टिकवणे ठाकूर पिता-पुत्रांसाठी आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे भाजपा विजयाची लय कायम ठेवण्यावर भर देणार आहे. सुरुवातीला भाजपाविरोधात सर्वच पक्ष एकत्र आले होते. परंतु, जागावाटपावरून बिनसले. ठाकरे गट आणि बविआ वेगळे लढत आहेत. काँग्रेस आणि मनसेला नाममात्र जागा देण्यात आलेल्या आहेत. अशातच वसई-विरारच्या जनतेसाठी हितेंद्र ठाकूर यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
पाणी योजना
६० लाख लिटरवरून आज ४३ करोड लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध. भविष्यातील ५० वर्षांसाठी पाण्याची तरतूद.
- देहरजी, खोलसापाडा १ व २, सुसरी प्रकल्प - १ ही कामे सुरु आहेत व प्रस्तावित. राजिवली, सातिवली, कामण इ. प्रकल्पांच्या माध्यमातून ४१.६ करोड लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होणार आहे.
- व्हॉल्वमनमुळे निर्माण होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अध्ययावत स्वयंचलित यंत्रणा राबविण्यात येईल. याबाबत यापूर्वीच चर्चा झाली आहे.
- खडकोली बंधारा दुरुस्त केल्यानंतर मोठ्या प्रमाणात समुद्राकडे जाणारे पाणी रोखता येईल.
- ४०० कोटीच्या भूमिगत व उंच पाण्याच्या टाक्या व पाईप लाईनचे काम चालू आहे.
खाडी पूल व रेल्वे ओव्हब्रीज
- भाईंदर-नायगांव नवीन खाडीपूल मेट्रोसहीत डीएमआरसी तयार करत आहे.
- वैतरणा खाडीपूल मंजूर. वसई ते पालघर नारिंगी खाडीवर पूल मंजूर.
- महापालिका क्षेत्रात ४ नवीन रेल्वे ओव्हरब्रीज: विरार-विराटनगर, नालासोपारा-ओसवालनगरी, नालासोपारा-अलकापूरी, वसई-उमेळमान
रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण
- अहमदाबाद महामार्गावरून वसई, निर्मळ, अर्नाळा व औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या ७ रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण.
- चिंचोटी-कामण-भिवंडी रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण काम मंजूर.
- शिरसाड-अंबाडी-वाशींद रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव.
- मनोर-वाडा-आसनगांव महामार्ग समृद्धी महामार्गास जोडण्याचा प्रस्ताव.
- आदिवासी पाड्यांमध्ये डांबरी किंवा काँक्रिटचे रस्ते तयार करणार.
- विरार-अलिबाग कॉरिडोर मेट्रो रेल्वेसह होणार.
जल वाहतूक - रोरो सेवा
- वसई-भाईंदर फेरीबोट सेवेच्या संख्येत वाढ करणे.
- विरार-नारिंगी ते खारवाडेश्वरी (टेंभी-खोडावे-सफाळा) फेरीबोट सेवा सुरू.
- प्रवासी वाहतूक लवकरच सुरू.
महिला व बाल कल्याण
१) अनाथ/निराश्रीत मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्सानात्मक रु. २५०००/-
२) विधवा/निराधार/परितक्ता/घटस्फोटीत महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी रु. २५०००/-
३) सर्व वयोगटातील महिला व १४ वर्षाखालील बालकांना डायलेसीस उपचाराकरीता प्रति डायलेसीस रु. ३५०/-
४) एकाकी ज्येष्ठ निराधार वय वर्ष ६० महिलेच्या उपजिविकेकरीता दरमहा रु. ३०००/-
५) वय वर्ष ६० वरील एकाकी ज्येष्ठ निराधार अपत्यहिन जोडप्यास व आदिवासी महिला यांना उपजिविकेकरीता दरमहा रु. ३०००/-
६) एकाकी ज्येष्ठ निराधार वय वर्ष ६० महिलेच्या उपजिविकेकरीता दरमहा रु. ३०००/-
७) महानगरपालिका हद्दीतील कुष्ठरोग बाधीत कुटुंबाला त्यांच्या उदरनिर्वाहाकरीता दरमहा रु. ३०००/-
८) अनाथ निराधार मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी एकदाच रु. २५०००/-
मच्छीमार / धुपप्रतिबंधक बंधारे / खार प्रतिबंधक बांध
- किनाऱ्यावरील कोळीवाडे मच्छिमार वसाहतींनी व्यापलेल्या शासकिय जागांची मालकी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी प्रयत्न.
- घाऊक बाजारांमध्ये शीतगृह व प्रक्रिया केंद्राची सुविधा देणार.
- एकूण सागरी किनाऱ्यालगत धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे.
पर्यटन
पालघर जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, सागरी पर्यटन, साहसी पर्यटन, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, बोटींग, वॉटर स्पोटर्स अशा अनेक सुविधा निर्माण करणार.
यामधून रोजगाराच्या सुविधा निर्माण होतील.
शिक्षण
विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्राथमिक शाळांना अद्यायावत करू. अनेक विद्यार्थी पात्र असतानाही फीचा खर्च झेपत नसल्यामुळे उच्चशिक्षणापासून वंचीत रहातात. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊ. युपीएस्सी/एमपीएस्सीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरीता विशेष मार्गदर्शन दिले जाईल.
परिवहन सेवा
आरामदायी व सुखकर प्रवास व्हावा याकरीता इलेक्ट्रीक बसेसची सोय करू.
शालेय बससेवा
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शाळांच्या वेळामध्ये केवळ विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा देऊ.
तलाव विकास
१०४ तलावांपैकी ४५ तलावांचे सुशोभिकरण करण्यात आले. उर्वरित तलावांचे सुशोभिकरणाचे काम प्रस्तावित.
भविष्यातील योजना
१) रक्तपेढी
२) किमोथेरेपीच्या सुविधेसह कॅन्सर सेंटर
३) फिजिओथेरेपी सेंटर
४) होमिओपॅथी सेंटर
५) स्वतंत्र टीबी हॉस्पिटल प्रस्तावित आहे.
पावसाळी पाण्याचा निचरा
- ठाणे कळवा खाडीचे तोंड चिखलगाळाने भरल्याने पावसाळ्यात ८० टक्के पाणी वसई खाडीत येते. त्यामुळे नायगाव मार्गे वसई खाडीकडे येणारे पाणी अडवले जाते व वसईत पूरपरिस्थिती निर्माण होते. ठाणे कळवा खाडीतील गाळ काढण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे.
- पावसाळी पाण्याच्या निचरासाठी समुद्राजवळील नाले रुंदीकरण तसेच नवीन उघाड्या (ब्रीज) बांधण्यात येतील.
- शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सामूहिक विकासाकरीता (क्लस्टर डेव्हल्पमेंट) प्रयत्न करू.
- झोपडपट्टी पुनर्वसन करण्याकरीता एसआरएची योजना राबविण्याचा प्रयत्न राहील.
- जंगल विभागातील व रेल्वेच्या जागेवरील घरांना नियमित करण्याचा प्रयत्न करू.
- वर्षानुवर्ष लादलेला 'शास्ती कर' रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- एकाकी असलेले ज्येष्ठ नागरीक यांना उपजिविकेसाठी अनुदान दिले जाते. त्यांची घरपट्टी देखील माफ करू.
- ज्या ज्येष्ठ नागरिकांचे पाल्य तात्पुरत्या स्वरूपात कुठे बाहेरगावी जात असतील त्या ज्येष्ठ नागरीकांना 'हॉलिडे होम'ची व्यवस्था करण्याचा प्रयत्न राहील.
- स्टेशनलगत अद्ययावत पार्किंगची सुविधा निर्माण करू.
- खाजगी जागेवर मालकी हक्काची घरे व इमारती आहेत त्यांना मालकी हक्क प्राप्त करून दिले जाईल.