वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सभापती व विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:42 IST2026-02-20T20:41:03+5:302026-02-20T20:42:01+5:30
याच सूत्रानुसार भाजपचे ६ सदस्य या समितीत जाणार होते.

वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सभापती व विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई विरार मनपाच्या निवडणुकीच्या ३५ दिवसानंतर पहिली महासभा घेण्यात आली. या महासभेत स्थायी समिती सभापती, १६ सदस्य व विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्यात आल्यानंतर तहकूब करण्यात आली. पहिलीच महासभा अनधिकृत बांधकामे व इतर प्रश्नावर वादळी होणार असे वाटत असताना प्रश्न उत्तर न होता दीड तासांत संपविण्यात आली. वसई विरार मनपाच्या निवडणुकीत बविआचे काँगेसच्या एका उमेदवारासह ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षीय संख्याबळानुसार बविआला स्थायी समितीमध्ये १० सदस्यांना पाठविण्याची संधी मिळाली होती. तर याच सूत्रानुसार भाजपचे ६ सदस्य या समितीत जाणार होते.
स्थायी समिती सभापती व सदस्यांची नेमणूक
वसई विरार मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती प्रफुल्ल साने यांची नेमणूक करण्यात आली. तर बविआकडून प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, आलमगीर डायर, प्रफुल्ल पाटील, सुनील पाटील, चंद्रशेखर धुरी आणि भाजपकडून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड या १६ सदस्यांची नेमणूक करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
विरोधी पक्ष नेते म्हणून मनोज पाटील यांची नियुक्ती
मनपाच्या ११५ नगरसेवकांपैकी ४३ नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने विरोधी पद भाजपला मिळणार होते. पण कोण होणार याकडे वसईकरांचे लक्ष लागून होते. शुक्रवारी महासभेत भाजपचे मनोज पाटील यांची विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर आहे अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांनी मनोज पाटील यांची विरोधी पक्षनेते नेमणूक झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
गटनेत्यासाठी कार्यालय न दिल्याने नगरसेवकांचा राडा
भाजप गटनेते अशोक शेळके यांना मनपा मुख्यालयात कार्यालय न उपलब्ध केल्याने भाजपाच्या ४३ नगरसेवकांनी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राडा घालून अंदाजे अर्धा तास जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोळींज पोलिसही घटनास्थळी पोहचले होते.