वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत ९ प्रभागात ९२ उमेदवारांचे अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:26 IST2026-01-01T20:25:11+5:302026-01-01T20:26:46+5:30
वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीसाठी प्राप्त ९३५ नामनिर्देशनपत्रांची बुधवारी रात्री उशिरा पर्यंत छाननी करण्यात आली. ९ प्रभागात २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत ९ प्रभागात ९२ उमेदवारांचे अर्ज बाद
नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीसाठी प्राप्त ९३५ नामनिर्देशनपत्रांची बुधवारी रात्री उशिरा पर्यंत छाननी करण्यात आली. ९ प्रभागात २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर मनपाच्या डी प्रभागातील वॉर्ड क्रमांक १५, १७ आणि २२ या तीन वॉर्डची रात्री उशिरा पर्यंत छाननी सुरू असल्याने काही काळ गोंधळ सुरू होता. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, शनिवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून वैध उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या ११५ नगरसेवक निवडणुकीसाठी २३ डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. ३० डिसेंबर पर्यंत एकूण २ हजार ९५२ नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले होते. ३० डिसेंबर रोजी म्हणजेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण मिळून ९३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर, बुधवारी सकाळी ११ वाजेपासून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्रे, अर्जाचे सर्व रकाने नीट भरले आहेत की नाही यासह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. ज्यांचे अर्ज परिपूर्ण आहेत, त्यांचे अर्ज वैध ठरवून अंतिम करण्यात आले. त्यानुसार ८४३ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर ९२ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत. तर ९ प्रभागातील ४४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. तसेच शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
क्र. निवडणूक कार्यालय वॉर्ड क्र संख्या बाद अर्ज
१) प्रभाग समिती ए २,५,१२ ५८ २
२) प्रभाग समिती बी ६,९,१०,१६ ९३ १०
३) प्रभाग समिती सी १,३,४,७ १०९ १४
४) प्रभाग समिती डी १५,१७,२२ ८६ ३१
५) प्रभाग समिती ई ११,१३,१४ ८९ ५
६) प्रभाग समिती एफ ८,१८,१९ ११६ ३
७) बहुउद्देशीय इमारत फादरवाडी २०,२१,२७ ११५ ७
८) प्रभाग समिती एच २३,२४,२६ ९१ ६
९) प्रभाग समिती आय २५,२८,२९ ८६ १४
मागे घेतलेल्याची माहिती
प्रभाग समिती फॉर्मची संख्या
१) ए ५
२) बी ०
३) सी २
४) डी २
५) ई १५
६) एफ २
७) जी ३
८) एच १५
९) आय ०