सर्वपक्षीय उमेदवारांचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:26 IST2025-12-31T15:26:16+5:302025-12-31T15:26:49+5:30
शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली.

सर्वपक्षीय उमेदवारांचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली; मात्र सुरुवातीच्या ४ दिवसांत सहा, सोमवारी ५९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तर सर्वपक्षीय इच्छुकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत मिरवणुका काढल्या आणि अर्ज दाखल केले.
शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांनी उमेदवार निश्चित करूनही एबी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे बहुतांशी इच्छुकांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी केली.
त्यांना ज्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला ते खुशीत होते तर ज्यांची उमेदवारी नाकारली होती, अशा काहींचा संताप अनावर झाला होता तर काहींना अश्रूही अनावर झालेले दिसले.
उमेदवारी अर्ज भरण्याचा ३० डिसेंबर शेवटचा दिवस होता. सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज भरायचे असल्याने इच्छुकांनी आधीपासूनच तयारी करून ठेवली होती. बहुतांश इच्छुकांनी सकाळी देवदर्शन केले. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणापासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या होत्या.
रस्त्यांवर वाहतूककोंडी
ढोल-ताशा, बँड वाजवत फटाके फोडत, घोषणा देत उमेदवार कार्यकर्त्यांसह निघाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर कोंडी झाली होती. अनेकांनी मिरवणुकीसह दुचाकी आणि चारचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.
अर्ज भरण्यासाठी केवळ उमेदवार आणि सूचक-अनुमोदक इतक्याच लोकांना आत सोडले जात होते. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांसह आलेले समर्थक निवडणूक कार्यालया बाहेर रस्त्याच्या कडेला, झाडांच्या आडोशाला ताटकळत होते.
शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी असल्याने उमेदवारी अर्ज तपासून तो स्वीकारण्याकरिता उमेदवारांची आत रांग लागल्याने अनेकांनी बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना वाट न पाहता परत जाण्यास सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्याची ३ वाजेपर्यंतची मुदत असली तरी ३ च्या आधी आलेल्या उमेदवारांचे उशिरापर्यंत अर्ज भरून घेण्याचे
सुरू होते. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची अनेकांनी चहा-नाष्टा आदींची सोय केली होती. मीरा भाईंदर शहरात आज खऱ्या अर्थाने सर्वत्र निवडणुकीचे वातावरण अनुभवयाला मिळाले.