दरोडा, मोक्क्यामध्ये सहा वर्षापासून फरार आरोपीला मध्य प्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2023 18:10 IST2023-03-04T18:09:20+5:302023-03-04T18:10:34+5:30
मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

दरोडा, मोक्क्यामध्ये सहा वर्षापासून फरार आरोपीला मध्य प्रदेशातून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, मोक्क्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मध्यप्रदेशातून गुरुवारी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.
३ सप्टेंबर २०१८ मध्ये फिर्यादी चालक सैतानलाल हरदेव गुजर हे रात्री तळोजा ते जयपुर मार्गे २९ टन कॉपर त्यांच्या ताब्यातील ट्रेलर मधुन घेवून जात होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खानिवडे टोल नाक्याचे पुर्वी आरोपींनी त्यांच्याकडील गाडया ट्रेलर समोर आडव्या लावुन चालक व क्लिनर यांना खाली उतरवुन जबरदस्तीने त्यांच्या खाजगी वाहनामध्ये बसविले. त्यांना चिबींपाडा, भिवंडी, चिंचोटी व परत भिवंडी नंतर धुमाळनगर असे फिरवुन नंतर वसई येथे उतरविले होते. चालकाच्या ताब्यातील ट्रेलरमधून २९ टन कॉपर व त्यांचा मोबाईल असा एकुण १ करोड ६३ लाख ९ हजार ६११ रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींनी दरोडा घालुन जबरदस्तीने चोरुन होता. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेवुन अटक करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी या गुन्हयामधील आरोपी नामे राकेशसिंह उदयसिंह राजवत कुशवाह हा गेले सहा वर्षापासुन पाहिजे आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय सरक यांनी या आरोपीबाबत गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी राकेश सिंह उदयसिंह राजावत उर्फ कुशवाह (४८) याला मध्यप्रदेशातून सापळा लावून गुरुवारी ताब्यात घेतले. आरोपीताकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याचा वर नमुद गुन्हयात सहभाग असल्याचे निषन्न झाले. या गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपीत याचे विरुध्द मोक्का कायदयतर्गत कारवाई करण्यात आली असुन त्याचा मोक्का कोर्ट केस नं ०३/२०१९ असा आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विरार पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, महेश वेल्हे, हनुमंत सुयवंशी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"