घराघरांत नळ' केव्हा? ; जल जीवनची निम्मी कामे अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:36 IST2025-01-15T16:34:11+5:302025-01-15T16:36:03+5:30
Wardha : कंत्राटदारांची मनमर्जी, विभागाचे दुर्लक्ष

When will there be taps in every household?; Half of the jal jeevan's work remains incomplete
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लीटर शुद्ध पाणी देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ही योजना राबविली जात आहे. दोन ते अडीच वर्षानंतरही निम्मे कामे अपूर्ण असल्याने घरात नळ आहे पण पाणी नाही, अशी अवस्था दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना पुरसे व शुद्ध पाणी मिळावे, याकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यांत जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात ८२९ कामे मंजूर करण्यात आली. या कामांचा कंत्राट देताना कोणतीही स्पर्धा न करता मूळ किंमतीलाच कंत्राट दिला. सन २०२३-२४ पासून कामाला सुरुवात करण्यात आली. आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरीही निम्मी कामे अपूर्ण आहे. त्यामुळे आता अडीच महिन्यात ही कामे पूर्ण होणार का? असा प्रश्न असून या योजनेनंतरही गावकऱ्यांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
४१० कामे फिजिकली पूर्ण
जिल्ह्यात सन २०२२-२३ पासून एकूण ८२९ कामांना सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ४१० कामेच फिजिकली पूर्ण झाली आहे. उर्वरित कामे अपूर्णच असल्याने नागरिकांना अद्यापही शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे घराघरांत नळ असून त्याला पाणी कधी येईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कामातील तक्रारींचा खच
या योजनेत कंत्राटदारांची मनमर्जी आणि संबंधित विभागाकडून होत असलेली पाठराखणच या योजनेच्या दिरंगाईत कारणीभूत ठरत आहे. झालेल्या कामांत अनेक तक्रारी असून खच पडला आहे.
तालुकानिहाय जलजीवनच्या कामांची माहिती
तालुका एकूण कामे पूर्ण कामे
आर्वी १३१ ९८
आष्टी ७३ ५६
देवळी ९६ २७
हिंगणघाट ११४ ३९
कारंजा ७४ ४४
समुद्रपूर १५६ ४८
सेलू १११ ६२
वर्धा ८४ ३६