वीज कधी जाणार, कधी येणार; आता मोबाइलवरच येणार मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:30 IST2025-08-04T18:29:49+5:302025-08-04T18:30:39+5:30
Wardha : मोबाइलवर मिळणार वीजबिल, तक्रारींचं उत्तर आणि नवीन जोडणीची माहिती!

When will electricity go out, when will it come back; Now messages will only come on mobile
वर्धा :वीजपुरवठ्यासंबंधी माहितीसाठी महावितरण कार्यालयात हेलपाटे मारणे किंवा फोन करण्याची आता आवश्यकता नाही. महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्यासाठी सोप्या आणि जलद सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 'महावितरण मोबाइल अॅप' आणि 'ऊर्जा' चॅटबॉट'च्या मदतीने तुम्ही आता घरबसल्या तुमच्या विजेच्या सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
महावितरणचे अॅप, हेल्पलाइनचीही सुविधा
महावितरण मोबाइल अॅप : हे अॅप गुगल प्ले स्टोअर्स आणि अॅपल अॅप स्टोअर्सवर उपलब्ध आहे. यावर तुम्हाला आवश्यक माहिती, तक्रार नोंदणी आणि इतर अनेक सुविधा मिळतील. 'ऊर्जा' चॅटबॉट : हा चॅटबॉट २४/७ उपलब्ध असून, तो तुम्हाला नवीन वीजजोडणी अर्जाची सद्यःस्थिती, वीज बिल भरणे, वीज बिलाचा तपशील, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल नोंदणी, स्वतः मीटर रीडिंग सबमिट करणे, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर आणि बिलाचे कॅल्क्युलेटर अशा अनेक गोष्टींमध्ये थेट मदत करेल. महावितरण संकेतस्थळ या (www.mahadiscom.in): संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
महावितरण कॉल सेंटर :
वीजपुरवठा, वीज देयक आणि इतर तक्रारींसाठी महावितरणचे २४/७कॉल सेंटर सदैव सेवेत आहे. तुम्ही १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या क्रमांकांवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
मोबाइल नंबरची नोंदणी कशी करायची
ग्राहकाला महावितरणकडे त्याचा मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे किंवा तो बदलणे खूप सोपे आहे. यासाठी 'MPEG <१२ अंकी ग्राहक क्रमांक > असा एसएमएस ९९३०३९९३०३ क्रमांकावर एसएमएस पाठवा, किंवा संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपवरूनही क्रमांक नोंदवू शकता.
जिल्ह्यातील ग्राहकांचे नंबर नोंद
महावितरण कंपनीने सुरू केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना विजेसंबंधात माहिती हवी त्यांचा मोबाइल क्रमांक महावितरणच्या अॅपवर नोंदविणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
या गोष्टींची माहिती एसएमएसवर
पावसाळ्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे, खांब पडणे किंवा तारा तुटणे, अशा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. अशा वेळी नेमकी काय समस्या आहे आणि ती कुठे आहे, याची माहिती ग्राहकांना पटकन मिळत नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन महावितरणने हे नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अॅप आणि चॅटबॉटमुळे तुम्हाला विजेच्या बिलाची माहिती, बिल भरणा, तक्रारी नोंदवणे आणि नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर मिळेल.