'हर घर नल से जल'मध्ये वर्धा जिल्हा ठरला नागपूर विभागातून अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:59 IST2025-03-06T17:57:43+5:302025-03-06T17:59:41+5:30
९८.२५ टक्के जोडणी झाली पूर्ण : जिल्ह्याची कामगिरी ठरली सरस

Wardha district tops Nagpur division in 'Har Ghar Nal se Jal' scheme
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे गुणवत्तापूर्ण केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठरविण्यात आलेल्या 'हर घर नल से जल' उद्दिष्टानुसार वर्ष २०२४-२५ अंतर्गत वर्धा जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ९४२ कुटुंबांपैकी २ लाख ३४ हजार ७५४ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे.
जिल्ह्याचे काम ९८.२५ टक्के पूर्ण झाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार गाव, जिल्हा व राज्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. यानुसार नियोजित घरगुती नळ जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन करण्यात येते. यासाठी गाव कृती आरखडा तयार करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत घेण्यात येते. वर्धा विभागातही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्य करीत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेत माहिती घेतात व सूचना करतात.
१,९८९ नळ जोडणी प्रगतीपथावर
जलजीवन मिशनअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. अशा योजनांची सुधारात्मक पुनर्जोडणी करून कार्यात्मक घरगुती नळ जोडणी दिली जाते. गावपातळीवर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुनर्जोडणी योजनांचा समावेश करण्यात येतो. जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर नल से जल' लक्षाप्रमाणे वर्धा विभागाने उत्तम कामगिरी करत ९८.२५ टक्के कुटुंबांना नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १ हजार ९८९ नळ जोडणी प्रगतीपथावर आहे.