वर्धा जिल्हा रुग्णालयाचा असाही सामंजस्य करार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:50 IST2025-03-03T12:47:09+5:302025-03-03T12:50:35+5:30

आरोग्यम् 'धन'संपदा : दीड वर्षापासून नागपूरला तपासण्या

Wardha District Hospital's MoU? | वर्धा जिल्हा रुग्णालयाचा असाही सामंजस्य करार?

Wardha District Hospital's MoU?

चेतन बेले 
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतानाच त्यांच्या कार्यकाळात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेला सावळागोंधळ बाहेर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांसाठी आवश्यक सर्व तपासणींची सुविधा असताना एसएनसीयू आणि डीईआयसी विभागाने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयासोबत बालकांची नेत्र तपासणी करण्यासाठी 'आर्थिक' सामंजस्य करार केला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून येथील बालरुग्णांना ७० किमी नागपूर येथील 'त्या' खासगी रुग्णालयात पाठवून तपासण्या केल्या जात आहेत. त्या नेमक्या कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ब्रेन स्टेम ईवोप ऑडिओमेन्ट्री (बेरा), रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी लेझर ट्रीटमेंट (आरओपी) तपासणीची उपकरणे, विशेष तज्ज्ञ आदी उपलब्ध आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता दीक्षित कार्यरत असेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात बेरा संबंधित तपासण्या केल्या जात होत्या. त्यांच्या कार्यकाळात या कराराची प्रक्रिया झाली. मात्र, त्यांनी या कराराला तीव्र विरोध केला होता. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी डॉ. संजय गाठे रुजू झाले. त्यानंतर कराराची प्रक्रिया पूर्ण होऊन बेरा, आरओपी तपासणीसाठी आलेले रुग्ण रुग्णवाहिकेतून ७० किमी अंतरावरील नागपूर येथील 'त्या' खासगी रुग्णालयात जाऊ लागले. तेथे उपचार करून पुन्हा रुग्णालयात दाखल केले जातात. यावर झालेला खर्च शासनाकडून वसूल केला जात आहे. यात मोठा घोळ होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे केली. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 


गाठे यांनी केली होती मारहाण
जिल्हा सामान्य रुग्णालयात एसएनसीयू आणि डीईआयसी येथील बालरुग्णांची बेरा व इतर तपासणीची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे सामंजस्य कराराची गरज काय, याबाबत यंत्रणेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमुळे संतापलेल्या डॉ. संजय गाठे प्रभारी यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या दालनात जाऊन मारहाण केली होती, हे विशेष. त्या मारहाणीमागे एमओयूसाठी होत असलेला विरोध, हे कारण असल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


नियुक्ती वर्धेत, पगार उचलतात कोल्हापुरातून
जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-१) म्हणून वर्षभरापूर्वी महिला डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गत वर्षभरापासून 'त्या' महिला अधिकाऱ्यांचे कधी रुग्णालयाला दर्शनच झाले नाही. मात्र, वर्धेच्या नियुक्तीचा कोल्हापूर येथून त्या पगार उचलत असल्याचे वास्तव आहे. अशी एक ना अनेक प्रकरणे रुग्णालयात असून, याचा ताण जिल्हा रुग्णालयावर येत आहे.


वरिष्ठांनीच केली दिशाभूल, सांगा कारवाई कोण करणार?
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदीला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी खतपाणी घातल्याची चर्चा आहे. नंतर नियुक्त झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना यासंदर्भात माहिती आहे. मात्र, यासंदर्भात कोणी बोलायला तयार नाही. रुग्णालयात नियुक्त एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, अद्याप साधी कारवाईही करण्यात न आल्याने यात मोठा घोटाळा तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.


"काही तपासण्यांची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात नाही. त्यामुळे शासनाच्या गाईडलाईननुसार एमओयू करार करण्यात आला आहे."
- डॉ. सुमंत वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा

Web Title: Wardha District Hospital's MoU?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा