वर्धा जिल्ह्यातील वायगाव (हळद्या) ची हळद जाणार आता दुबईला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:29 IST2025-05-08T17:28:21+5:302025-05-08T17:29:38+5:30

भौगोलिक मानांकन प्राप्त : २०२५ मध्ये १.५ मे. टन ओली हळद होणार निर्यात

Turmeric from Waigaon (Haldya) in Wardha district will now go to Dubai! | वर्धा जिल्ह्यातील वायगाव (हळद्या) ची हळद जाणार आता दुबईला !

Turmeric from Waigaon (Haldya) in Wardha district will now go to Dubai!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन जी. आय. टॅग क्रमांक २६८ प्राप्त झाले आहे. हे मानांकन २०१६ मध्ये वायगात हळद शेतकरी उत्पादक कंपनी लि. गिरड ता. समुद्रपूर यांनी प्राप्त केले आहे. वायगाव भागातील जमिनीत पिकणाऱ्या हळदीच्या विशिष्ट औषधी गुणधर्मामुळे तिला हे मानांकन मिळाले आहे. विदेशात या हळदीला मागणी असून जिल्ह्यातील वायगाव हळद पहिल्यांदाच दुबई येथे निर्यात करण्यात येणार आहे.


वायगाव हळदीच्या कंटेनरला जिल्हाधिकारी कार्यालयातून ९ मे रोजी जिल्हाधिकारी वान्मयी सी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात येणार आहे. सन २०२५ या वर्षात वर्ध्यातून आत्मा आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टर यांच्या सहकार्याने जवळपास १.५ मेट्रिक टन ओल्या वायगाव हळदीची निर्यात करण्याचे ठरविले आहे. 


शेतकऱ्यांना होणार फायदा
निर्यातीमध्ये कृषिन्नोती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, वायगाव (ह.) तालुका समुद्रपूर विदर्भ नैसर्गिक शेतमाल किसान उत्पादक कंपनी लिमिटेड खैरगाव आणि वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनी लि. गिरह, ता. समुद्रपूर या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला. ओल्या हळदीची निर्यात दुबई येथे करण्यात येत आहे. आगामी काळात निर्यातीचे मोठ्या प्रमाणावर पुरवठा आदेश प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


वार्षिक उत्पादन होतेय ५६१.४० मेट्रिक टन
वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील हळद उत्पादक जिल्हह्यांपैकी एक आहे. येथील हवामान आणि जमीन हळदीच्या लागवडीसाठी बऱ्यापैकी अनुकूल आहे. समुद्रपूर तालुक्यात १६०.४० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. यात सिंचनाखालील आणि कोरडवाहू जमिनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील वार्षिक हळद उत्पादन सुमारे ५६१.४० मेट्रिक टन इतके आहे.


वायगाव हळदीची खास वैशिष्ट्ये
वायगावची हळद गडद पिवळ्या रंगाची, म्हणजेच केशरी रंगाकडे झुकलेली असते. इतर हळदीच्या तुलनेत तिचा रंग अधिक आकर्षक असतो. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण खूप जास्त असते, जे साधारणपणे ६ टक्क्यापेक्षा अधिक असते. कुरकुमीन हे हळदीतील एक महत्वाचे बायो अॅक्टिव्ह संयुग आहे. ज्यामुळे हळदीला औषधी गुणधर्म मिळतात. वायगावच्या हळदीची चव तीव्र आणि सुगंध आकर्षक असतो. त्यात तेल अंश भरपूर असतो. या हळदीची पावडर अत्यंत मऊ आणि बारीक असते. पारंपरिकरित्या, वायगावची हळद जखमांवर आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी मानली जाते. तिच्यातील उच्च कुरकुमीनमुळे तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.


 

Web Title: Turmeric from Waigaon (Haldya) in Wardha district will now go to Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.