‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची कसून तपासणी सुरू; दर्जावरच टिकेल मान्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:18 IST2025-08-06T20:18:07+5:302025-08-06T20:18:42+5:30

बोगसपणा आढळल्यास कारवाई : सेतू केंद्राची मान्यताही होऊ शकते रद्द

Thorough inspection of 'Aaple Sarkar' service centers begins; Approval will be based on quality only! | ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची कसून तपासणी सुरू; दर्जावरच टिकेल मान्यता!

Thorough inspection of 'Aaple Sarkar' service centers begins; Approval will be based on quality only!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
आपले सरकार सेवा केंद्राच्या गुणवत्तेचे मूल्यमापन जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या संनियंत्रणात सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे केंद्रचालकांना आपली सेवा सुधारावी लागेल अन्यथा केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते.


'आपले सरकार' सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना प्रमाणपत्र, उतारे व इतर सेवा सशुल्क पुरविल्या जातात. या सेवा देताना अनेकदा काही केंद्रांवरून नागरिकांकडून अधिकचे पैसे घेतले जातात, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होतात. ही बाब टाळण्यासाठी राज्यभरातच आपले सरकार सेवा केंद्रांच्या कामाचे व व्यवस्थापनाचे मूल्यमापन होणार आहे.


केंद्राच्या सर्वाधिक तक्रारी कोणत्या ?
प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाते, असा आरोप केला जातो. आर्थिक लूट होत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी दिसून येतात. याशिवाय मंजूर ठिकाणी केंद्र चालविले जात नसल्याच्याही तक्रारी आहेत.


कसे होणार मूल्यमापन ?
आपले सरकार सेवा केंद्रात नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे, मंजुरीच्याच ठिकाणी केंद्र चालविले जात आहे का?, ज्याच्या नावे मंजूर आहे तीच व्यक्ती केंद्र चालवित आहे का? दर्शनीभागात केंद्राचे फलक आहे का?, दिल्या जाणाऱ्या सेवांचे दरफलक, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी सोय आहे काय? आदी गोष्टींचा विचार मूल्यमापनात केला जाणार आहे. 


आपले सरकार केंद्रात सुविधा कोणत्या ?

  • 'आपले सरकार' केंद्रात विविध सरकारी सेवा ऑनलाइन मिळतात. यात जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जमिनीचे उतारे (७/१२, नमुना - ८ उतारा) आणि इतर शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याची सोय आहे.
  • जिल्ह्यात सेतू केंद्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे अवैध प्रकारे चालविल्या जाणार केंद्रांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते.


तालुकानिहाय आपले सेवा केंद्र
तालुका       सेवा केंद्र

आर्वी              ९८
आष्टी              ६८
देवळी            १२१
हिंगणघाट       १४५
कारंजा            ६५
समुद्रपूर          १०४
सेलू                ११४
वर्धा                १९२


"आपले सरकार सेवा केंद्रांच्या पडताळणीचे काम सुरू झालेले आहे. काही दिवसांतच केंद्रांवरील कार्यवाहीबाबतची माहिती उपलब्ध होईल. केंद्राचे बोर्ड असणे आवश्यक आहे, तसेच नवीन दर असलेली सेवा यादी, नागरिकांना बसायला जागा व पिण्याचे शुद्ध पाणी असणे आवश्यक आहे."
- प्रतिक उमाटे, जिल्हा व्यवस्थापक.

Web Title: Thorough inspection of 'Aaple Sarkar' service centers begins; Approval will be based on quality only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा