अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:41 IST2024-08-28T17:38:52+5:302024-08-28T17:41:59+5:30
Wardha : छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन केले आंदोलन

They should apologize to Maharashtra , Mahavikas Aghadi protests against government
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. मोठ्या थाटात अनावरणही करण्यात आले. परंतु अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने जनभावना उफाळून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निषेध आंदोलनातून केली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि शरद पवार गटाच्यावतीने वेगवेगळे आंदोलन करून या घटनेचा निषेध नोदविला. काँग्रेसच्यावतीने केलेल्या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, पांडुरंग देशमुख, सुरेश ठाकरे, डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. सचिन पावडे यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार गटाच्यावतीने केलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, प्रा. खालील खतीब, शहराध्यक्ष मुन्ना झाडे, संदीप भांडवलकर, प्रवीण पेठे, नितीन देशमुख, अमर देशमुख, आशिष लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टी' नेही केले आंदोलन
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कोसळणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्यावतीने वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, प्रमोद भोमले, पंकज सत्यकार, असलम पठाण, प्रकाश डोडाणी, संजय आचार्य, सूर्या सोनोने, इसराइल शेख, कुणाल लोणारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.