"निवडणूक आयोगाचा कारभार झाला दस नंबरी ! आणखी किती पुरावे द्यायचे"; हर्षवर्धन सपकाळ यांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:44 IST2025-11-06T13:42:22+5:302025-11-06T13:44:07+5:30
Wardha : हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या नावासमोर 'स्टार' लावावेत.

"The Election Commission has become a fraud! How much more evidence do we need to provide"; Harshvardhan Sapkal alleges
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम (वर्धा) : राहुल गांधी यांनी मतचोरी प्रकरणात निवडणूक आयोगाला ठोस पुरावे सादर केले आहेत. आणखी किती पुरावे द्यायचे? तरीही आयोग झोपेतून जागा होण्यास तयार नाही. निवडणूक आयोगाचा कारभार 'दस नंबरी' झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सेवाग्राम येथे केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या नावासमोर 'स्टार' लावावेत. आम्ही इतका मोठा दस्तऐवज आयोगासमोर ठेवला, तरी ते पुरावेच मागत आहेत. पुरावे दिल्यानंतरही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.
शेतकरी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. पॅकेज जाहीर केले; पण त्यात किती गळती आहे, हे बघितले नाही. शेतकऱ्यांकरिता प्रहारचे बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन केले. त्यांना शासनाने दिलेले आश्वासन फोल ठरू नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी इतकीच अपेक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या आघाडीबद्दल विचारले असता सपकाळ म्हणाले की, त्यांनी अद्याप काँग्रेसकडे कोणत्याही प्रकारचा आघाडीचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आघाडीचा प्रश्नच येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २ निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांनाच देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.