कंटेनरची उभ्या ट्रकला धडक, आगीत कंटनेर जळून राख
By रवींद्र चांदेकर | Updated: July 12, 2024 19:06 IST2024-07-12T19:03:12+5:302024-07-12T19:06:01+5:30
दोघे जखमी : जाम परिसरातील घटना, लाखो रुपयांचे साहित्य जळून राख

The container collided with the vertical truck
वर्धा : भरधाव कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कंटेनरने पेट घेतल्याने त्यात वाहून नेत असलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, १२ रोजी पहाटेच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील जाम परिसरात घडली. चालक अलताफ अली, रा. इलाहाबाद, वाहक दीपक कुमारपाल अशी जखमींची नावे आहे.
गुडगाव दिल्ली येथे एचआर ५५ एएम ३६२१ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादवरून चप्पल, पर्स बॅग पॅकेट, रेनकोट, लेडीज व जेंट्स गारमेंट, काजू पॅकेट इत्यादी कुरिअरच्या वस्तू घेऊन दिल्ली गुडगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान जाम परिसरात रस्त्याच्या बाजूला बंद स्थितीत असलेल्या सीजी १३ एलएल ४९३६ क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रकला या कंटनेरने मागून धडक दिली. या अपघातात कंटेनरला आग लागली. त्यामध्ये चालक अलताफ अली, वाहक दीपक कुमारपाल दोन्ही गंभीर जखमी झाले. घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना तसेच हिंगणघाट अग्निशामक विभागाला दिली. हिंगणघाटवरून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, ते पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. यात कंटेनरमध्ये असलेल्या वस्तू खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी मनोज कोसूरकर, आशिष कांबळे, जितेंद्र वैद्य, रमाकांत साळवे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात व नंतर वर्धा येथे हलविण्यात आले. यासंबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.